हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वकील गुणरत्न सदावर्ते यांना मोठा दणका बसला आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बार काउन्सिल ऑफ इंडियाने सदावर्तेंची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी रद्द करण्यात आली आहे. वकील सुशील मंचरकर यांनी बार कौन्सिल यांच्याकडे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याबाबत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर तपासणी अंतर्गत गुणरत्न सदावर्ते यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी रद्द करण्यात आली आहे. या कारवाईमुळे सदावर्ते यांना 2 वर्ष कुठल्याही प्रकारची केस लढवता येणार नाही.
राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सदावर्ते यांनी कर्मचाऱ्यांची बाजू न्यायालयात मांडली होती. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर चांगलंच तोंडसुख घेतल्याचे आपण बघितलं. एसटी कर्मचाऱ्यांची बाजू मांडण्यासाठी गुणरत्न सदावर्ते यांनी आझाद मैदानावर अनेकदा सरकारच्या विरोधात हल्लाबोल केला होता, त्यावेळी त्यांनी वकिली पेशाची ओळख असलेला काळा कोट परिधान केलेला असताना हातात पट्टी बांधून वकिली पेशाचे उल्लंघन केले. तसेच अनेकदा आंदोलना दरम्यान मीडिया समोर चुकीची वक्तव्ये केली होती.
यानंतर ॲड. सुशील मंचेकर यांनी याबाबत महाराष्ट्र बार काउंन्सिलकडे सदावर्ते यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. सदावर्ते यांनी नियमांचे उल्लंघन करत कोट आणि बँड घालून डान्स केला. वकिलांचा कोट आणि बँड न्यायालयाबाहेर सार्वजनिक ठिकाणी परिधान करणे, तो घालून नाचणे, या सर्व नियमाचे उल्लंघन करणाऱ्या गोष्टी सदावर्तेंनी केल्याचे या तक्रारीत नमुद करण्यात आले होते. त्यानंतर 7 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बार कौन्सिलने सदावर्तेंविरोधात शिस्तभंगाची कारवाई सुरू केली.
दरम्यान, ही कारवाई राजकीय हेतून प्रेरित असल्याचा दावा करत सदावर्तेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.मात्र उच्च न्यायालयाने देखील सदावर्ते यांच्या विरोधातील शिस्तभंगाची कारवाई थांबवण्यास नकार दिला होता. आता महाराष्ट्र बार काउन्सिल ऑफ इंडियाने सदावर्तेंची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी रद्द करत त्यांना जोरदार दणका दिला आहे. त्यामुळे सदावर्ते यांना आता 2 वर्ष कुठल्याही प्रकारची केस लढवता येणार नाही.