घरात घुसून चाकूचा धाक दाखवत लुटले, तातडीने कारवाई करत पोलिसांकडून एकास अटक

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

शिराळा तालुक्यातील चरण येथील दुर्गा हॉटेलचे मालक संजय पुजारी यांच्या घरात घुसून अज्ञात चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून, अंगावरील सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटली. यानंतर तेथून पोबारा करताना बीऊर येथे नाकाबंदी करणाऱ्या शिराळा पोलिसांच्या पथकाला यातील एक आरोपी हाती लागला तर उर्वरित दोन आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून गेले.

या घटनेचा गुन्हा कोकरूड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे. संजय पुजारी हे शुक्रवारी रात्री घरी असताना अचानक तीन अज्ञात युवक घरात घुसले व हातातील सुरा त्यांच्या गाळ्याला लावून जीवे मारण्याची धमकी देत, त्यांच्या गळ्यातील दोन सोन्याच्या साखळ्या डाव्या हातातील अंगठी तसेच त्यांच्या खिशातील रोख रक्कम असा एकूण 3 लाख 06 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेला.

कोकरूड पोलिसांनी पथकासोबत घटनास्थळी धाव घेतली. यानंतर नाकाबंदी करण्यात आली. मोटारसायकल वरील आरोपी प्रफुल कांबळे व साथीदार रस्त्यावरील वळणावर साचलेली साचलेल्या, खडी वरून गाडी घसरून खाली पडले. त्यावेळी समोर असलेल्या पोलिसांनी आरोपी सलमान कांबळे पकडले मात्र दोन आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून गेले.