नवी दिल्ली । भारतात कोरोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशा वेळी सरकार नागरिकांना वारंवार कोरोना सदृश लक्षणे आढळल्यास डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला देत आहेत. मात्र अनेक रुग्ण ताप, सर्दी, खोकला याकरिता मेडिकलवरून थेट औषधे घेऊन जातात. हे लक्षात घेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काही राज्यांतील औषधविक्रेत्यांना ताप, सर्दी, खोकला वा तत्सम औषधे विकत घेणाऱ्या रुग्णांनी दिलेली माहिती संकलित करण्याचे सूचित केले आहे. तेलंगण, आंध्र प्रदेश, बिहार तसेच ओडिशामध्ये या दृष्टीने माहिती संकलित करण्यास सुरुवात केली असून महाराष्ट्रामध्ये अशी माहिती ठेवण्याचे निर्देश देण्यात येणार असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
काही राज्यांमध्ये ताप, सर्दी किंवा अशा प्रकारची लक्षणे असलेल्या रुग्णांकडून डॉक्टरकडे न जाता परस्पर तापाची औषधे दुकानांतून घेतली जातात. ताप तसेच इतर लक्षणांसाठी अनेक रुग्ण थेट औषधे घेऊन जातात. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामध्ये हे आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचे आहे. रुग्णाने किती दिवसांपूर्वी औषध नेले होते, कोणता त्रास होत असल्यामुळे हे औषध घेण्यात आले, याचीही माहिती फार्मासिस्टना मिळत असते.
या माहितीवरून एखाद्या भागामध्ये केवळ ताप वा सर्दी, खोकल्यासाठी औषधे नेण्याचा कल अधिक आहे का, याचीही पाहणी करण्यात येणार आहे. महाराष्ट्रामध्ये अद्याप असे निर्देश देण्यात आले नाहीत, असे औषध विक्रेत्यांच्या संघटना सदस्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कोरोनाच्या उपचार पद्धतीमध्ये देण्यात येणाऱ्या औषधांची माहिती रोज अपडेट करावी लागते. त्यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाकडून विचारणा केली जाते. हायड्रोक्सीक्लोरोक्वीन तसेच सर्दी-खोकला-ताप या आजारांसह इतर श्वसनविकारासाठी देण्यात येणाऱ्या औषधांच्या उपलब्धतेसंदर्भात माहिती दैनदिन स्वरूपात देण्यात येते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”