Tuesday, January 31, 2023

हृदयदावक ! आजीच्या डोळ्यासमोर तीन नातवंडे गेली वाहून; दोघांचे मृतदेह सापडले तर एक बेपत्ता

- Advertisement -

औरंगाबाद – जिल्ह्यातील वाणेगाव येथील गिरजा नदीच्या पात्रात तीन लहान मुलं बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यापैकी दोन मुलांचे मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले आहेत. तर एका मुलाचा तपास सुरु आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. बचाव पथकाच्या हाती आलेले दोन्ही मृतदेह हे दोन सख्या भावांचे आहेत. तर त्यांच्या मित्राचा शोध सुरु आहे. हे तीनही मित्र आपल्या आजीसोबत नदीवर कपडे धुवायला गेले होते. यावेळी संबंधित प्रकार घडला.

वाणेगावच्या मुक्ताबाई रामराव शेजवळ या वृद्ध महिला आज (6 ऑक्टोबर) दुपारी दोन वाजेच्या सुमारास आपल्या नातवांसह गिरजा नदीच्या किनाऱ्यावर कपडे धुण्यासाठी आल्या होत्या. खरंतर मुक्ताबाई या कर्णबधीर आहेत. त्या कपडे धुत होत्या. यावेळी त्यांचा नातू निलेश हा त्याचे दोन मित्र गौरव पाचवणे (वय 6) आणि विजू पाचवणे (वय 11) यांच्यासोबत नदी पात्रात खेळत होते. यावेळी नदी पात्रातले पाणी वाढले आणि पाण्याचा अंदाज न आल्याने तीनही मुलं बुडाली. संबंधित घटना जेव्हा आजीच्या लक्षात आली तेव्हा तिने मदतीसाठी गावात धाव घेतली. यावेळी काही गावकरी आजीच्या जवळ आली. त्यांनी आजी काय म्हणतेय ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सगळे नदीच्या दिशेला पळत सुटली. काही गावकऱ्यांनी तातडीने पाण्यात उडी मारत मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत उशिर झाला होता. तीनही मुलांचा शोध लागत नव्हता.

- Advertisement -

अखेर संबंधित घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दालाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने बचावकार्य सुरु केलं. बराचवेळ शोध घेतल्यानंतर गौरव पाचवणे आणि विजू पाचवणे या दोन्ही सख्ख्या भावांचे मृतदेह जवानांच्या हाती लागला. अग्निशमन दलाचे जवान निलेश शेजवळ या मुलाचा शोध घेत आहेत. दरम्यान, गिरजा नदीच्या किनाऱ्यावर ग्रामस्थांनी गर्दी केली. मृतक मुलांच्या आई-वडिलांनी यावेळी टाहो फोडला. त्यांचा आक्रोश बघून गावकऱ्यांनाही अश्रू अनावर झाले. मुक्ताबाई खरंतर तीनही मुलांना सोबत घेऊन जात नव्हत्या. पण मुलं हट्ट करत असल्याने ते त्यांना सोबत घेऊन गेल्या.