साताऱ्यात उष्णतेची लाट : पारा 41 अंशाच्या पुढे, महाबळेश्वरही तापले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात उष्णतेची लाट असून गुरुवारी कमाल तापमानाचा पारा 41.2 अंशांवर होता. यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आले. थंड हवेचे ठिकाण समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वरचे तापमान 33.08 अंशांवर होते. उन्हाळा सुरू झाल्यानंतर गुरुवारी नोंदवण्यात आलेले तापमान यंदाच्या मोसमातील सर्वाधिक आहे. उष्णतेची लाट आल्याने लोकांना दुपारच्या वेळेत मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

उष्णतेच्या लाटेमुळे दुपारच्या वेळेत बाजारपेठेतील व्यवहारही ठप्प होत आहेत. तर शेतकरी वर्गही शेतातील कामे दुपारच्या वेळेत बंदच ठेवत आहेत. वाढत्या तापमानामुळे नागरिक दुपारी घरातच राहणे पसंत करत आहेत. यामुळे सातारकर नागरिक गेल्या दोन दिवसांपासून चांगलेच घामाघूम झाले आहेत. एप्रिल महिन्याच्या अखेरीस ही स्थिती असेल, तर मे महिना कसा काढायचा, याची चिंता सर्वांनाच सतावू लागली आहे.

गावोगावच्या यात्रा-जत्रा व ऐन लग्नसराईच्या धामधुमीत तापमानात वाढ होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. पाहुणे मंडळींचीही चांगलीच दमछाक होताना दिसत आहे. उन्हाचा चटका वाढत असल्याने थंड पेयांना चांगलीच मागणी वाढली आहे.

गुरूवारी राज्यात जिल्हानिहाय तापमान पुढीलप्रमाणे

अकोला 45.4, अमरावती 44.4, बुलढाणा 42.3३, ब्रह्मपुरी 45.2, चंद्रपूर 43.8, गोंदिया 43.5, नागपूर 44.3, वाशिम 43.0, वर्धा 45.1, पुणे 41.8, कोल्हापूर 37.6, महाबळेश्वर 33.8, नाशिक 41.1, सांगली 39.3, सातारा 41.2, सोलापूर 43.4, औरंगाबाद 42.4, परभणी 43.8, मुंबई 35.2,