अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा! येत्या २ दिवसांत नुकसान भरपाईचे पैसे खात्यात जमा होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर । निवडणूक आयोगाने परवानगी दिल्याने येत्या शनिवारपर्यंत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार आहे. जून ते ऑक्टोबरदरम्यान नुकसान झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारकडून 294 कोटी 81 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील जवळपास पाच लाख पूरग्रस्त शेतकऱ्यांची खातेनिहाय यादी तयार करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यात शनिवारपर्यंत पैसे जमा होतील. (Heavy Rain affected farmers will get govt aid in two days)

जिल्हा प्रशासनाकडून बँकांना मदतनिधीचे लवकरात लवकर वाटप करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी पूरग्रस्त शेतकऱ्यांची यादी बँकांकडे सुपूर्द करण्यात आली आहे. संबंधित खातेदारांच्या खात्यात पैसे शनिवारपर्यंत जमा होतील, असे बँकेच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

गेल्याच आठवड्यात यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांना पुढील आठवड्यापासून नुकसानभरपाई मिळण्यास सुरुवात होईल, असे आश्वासन दिले होते. पदवीधर शिक्षक मंडळाच्या निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे शेतकऱ्यांना मदत देण्यात अडथळा येत होता. मात्र, राज्य सरकारने निवडणूक अधिकाऱ्यांना यासंदर्भात पत्र पाठवून परवानगी मिळवली होती.

‘पण केंद्राचे पथक महाराष्ट्रात फिरकलेच नाही’
काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या मुद्यावरुन आक्रमक झालेले भाजप नेते केंद्र सरकारच्या मदतीसंदर्भात शांत का आहेत, असा सवालही वडेट्टीवार यांनी बुधवारी उपस्थित केला होता. महाराष्ट्रातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. आज 18 दिवस उलटूनही केंद्र सरकारचे पाहणी पथक राज्यात फिरकलेले नाही. विरोधक यावर चकार शब्दही बोलत नाहीत, नक्की काय गौडबंगाल आहे? कुठे गेले केंद्राचे पथक आणि कुठे गेले विरोधक?, असे वडेट्टीवार यांनी विचारले. तसेच या प्रश्नावर विरोधकांनी मोठा आवाज नको पण किमान पोपटासारखा आवाज तरी काढावा, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला.

ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

 

 

Leave a Comment