भारनियमनामुळे शहरातील लाखांवर घरांची वीज गुल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगबाद – विजेच्या वाढत्या मागणीमुळे शहरातील ज्या भागात थकबाकी आणि वीजचोरी अधिक आहे, अशा 38 फिडरवर काल महावितरणला भारनियमन करावे लागले. शहरात एक ते तीन तासांपर्यंत भारनियमन केल्याची माहिती अधीक्षक अभियंता प्रकाश जमधडे यांनी दिली. यामुळे शहरातील जवळपास एक लाख ग्राहकांच्या घरात वीज गुल झाली होती. राज्यात विजेच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे मागणी व उपलब्धता यामध्ये समतोल साधण्यासाठी तसेच विजेच्या सर्वाधिक मागणीच्या काळात भार व्यवस्थापन करण्यासाठी शहरात भारनियमन करण्यात आले.

महावितरणने वितरण व वाणिज्यिक हानीनुसार वीजवाहिन्यांचे ए, बी, सी, डी, ई, एफ, जी-1, जी-2 व जी-3 असे गट तयार केलेले आहेत. शहरात एकूण 150 फिडर आहेत. त्यापैकी सकाळच्या सत्रात 32 फिडरवर तर दुपारच्या सत्रात 10 फिडरवर लोडशेडिंग करण्यात आले.

औरंगाबाद शहरात गुरुवारी सकाळी 5:30 ते 6:45, 6 ते 6:45, 6:15 ते 6:45, दुपारी 3 ते 4, 3:30 ते 4:15, 3:30 ते 7 अशा वेगवेगळ्या वेळेत ई ते जी-3 या वीजबिलांची सर्वाधिक थकबाकी असलेल्या पाच गटातील 38 फिडरवर एक ते तीन तास भारनियमन करण्यात आले. विजेच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी ग्राहकांनी वीजबिल भरून सहकार्य करावे, अन्यथा पुढील काही दिवस भारनियमन अटळ आहे, असे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले.

Leave a Comment