हिंदकेसरी आंधळकरानी दिलेली छत्री किसन आप्पाना लाखमोलाची वाटते…!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष लेख | संपत मोरे 

“मी तरुण असल्यापासून हिंदकेसरी गणपतराव आबांचा चाहता. त्यांची कुस्ती असलेलं समजलं की मी अगदी शेतात सुगीची काम असली तरी ती टाळून कुस्तीला जायचो. नंतर आबा कुस्त्या खेळायचे बंद झाले तरी मी त्याना भेटायला जात होतो, ते मैदानात आल्याचे कळताच मी उठून त्यांच्याकडे जायचो.” सांगली जिल्ह्यातील रामापूरचे कुस्तीप्रेमी माझे आजोबा किसन यादव यांनी सांगितले.

“त्यांच मूळ गाव आंधळी आणि माझं रामापूर. आमच्या दोघांच्या गावाच्या मध्ये फक्त एक गाव. त्यामुळं मला या शिवधडीच्या माणसाचा अभिमान वाटायचा. त्याचं नाव पुकारलं तरी ऊर भरून यायचा. मी कोल्हापूरला गेलो की त्याना भेटायला जायचो. एकदा भेटायला गेलो तेव्हा पावसाळ्याचे दिवस होते, मी भिजतच गेलो.मला बघितल्यावर ते म्हणाले

महाराष्ट्राची कुस्ती ग्लॅमरस होतेय…

गाववाले भिजतच आलाय. छत्री न्हाय का?
“नाही “मी म्हणालो. मग मी तास दीड तास गप्पा मारत बसलो. कुस्ती आणि राजकारण हे आमच्या गप्पांचे विषय असायचे. येताना त्यानीं मला त्यांच्याकडची नवी कोरी छत्री दिली. म्हणाले, “भिजत जाऊ नका” या गोष्टीला तीस वर्षे झालीत. मी आजही ती छत्री माझ्याजवळ आहे आणि माझ्या पुढच्या पिढीलाही त्या महान मल्लाचा हातची छत्री जपून ठेवायला सांगणार आहे” ८२ वर्षाचे यादव सांगतात. गेली काही वर्षे आपल्यावर प्रेम करणारा कुस्तीशौकीन पावसात भिजू नये म्हणून त्याची काळजी घेणारे आणि त्याला स्वतःची छत्री देणारे हिंदकेसरी गणपतराव आंधळकर कुस्तीप्रेमी माणसांवर किती प्रेम करायचे हेच या प्रसंगातून लक्षात येतं. १९६० सालचे हिंदकेसरी आणि १९६२ चे अर्जुनवीर पुरस्कार मिळवून कुस्तीचे वैभव वाढवणारे जकार्तावीर आबा यांचं लोकांच्यावर प्रचंड प्रेम होतं.

आबांचे मूळ गाव पलूसजवळच आंधळी.त्याचं मूळ नाव गणपतराव माने. त्याचे वडील शिराळा तालुक्यातील पुनवतला गेले. तेव्हापासून आंधळी या गावाशी त्यांचा संपर्क तुटला. पण गणपतराव यांनी मात्र आपल्या माने आडनावाऐवजी आंधळकर हेच नाव घेतले. आणि कुस्तीत एवढी मोठी कामगिरी केली त्या गावाचे नाव जगभर पोहोचवले. कुस्तीत चांगली कामगिरी केल्यावर आबांनी त्यांच्या जन्मभूमीत आंधळीत अनेक वर्षे मोठ्या कुस्त्या भरवल्या या कुस्त्या एवढ्या मोठ्या असायच्या की एकासाली विट्यासारख्या त्या भागातील मोठ्या शहरातील जत्रेच्या कुस्त्या केवळ आंधळी या खेडेगावातील कुस्त्यांमुळे दोन दिवस पुढे ढकलल्या होत्या. देशातील सगळे दिगज्ज पैलवान आंधळीत आले होते. १९७८ पर्यंत आंधळी या गावच्या कुस्त्या सुरु होत्या. नंतर आबांनी तालमीकडे लक्ष दिल्यामुळे या गावच्या कुस्त्या बंद झाल्या. आंधळी गावाने या पैलवानाचे नाव हायस्कुलला देऊन या मल्लाच्या कामगिरीला सलाम केला आहे. एकदा वडिलांनी आंधळी गाव सोडल्यावर पुन्हा त्याच गावाचं नाव स्वतःच्या नावपुढं घेणं आणि ते गाव शोधत येऊन त्या गावात कुस्त्याची मैदान भरवण यातून आबा आपल्या मूळ गावाची नाळ विसरले नव्हते हेच दिसते.

क्रांतिसिंह नाना पाटील

जगाच्या पाठीवर जाऊन कुस्तीचे आखाडे गाजवलेला हा योद्धा आपल्या दुष्काळी भागातील गावाला विसरलेला नव्हता. या भागात कुस्ती उभा राहिली पाहिजे, टिकली पाहिजे म्हणून आबा नेहमीच प्रयत्नशील राहिले. त्यामुळेच येरळा नदीच्या काठच्या भाळवणी गावचा डब्बल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील असो किंवा आटपाडीचा मारुती जाधव असो या मल्लांच्या पाठीवर त्यांचा नेहमीच हात राहिला. जानेवारीदरम्यान वांगीजवळ अपघातात मरण पावलेल्या विजय शिंदे यांचे वडील शिवाजी शिंदे सांगतात, “विजयवर आबांचा जीव होता. आम्ही भेटायला गेल्यावर आबा सांगायचे ,’तुम्ही विजुची काळजी करू नका. तो मोठा पैलवान होणार आहे’विजुच्या आग्रहाखातर एकदा आबा गावातील तालमीला भेट द्यायला आले होते. अपघातात विजयचा मृत्यू झाल्याची बातमी आबांना कळवू नका कारण आबांना सहन होणार नाही. असं विजुच्या वडीलानी सांगितले होते. आबाना त्याची आठवण झाली की ते त्याची चौकशी करायचे पण’ त्याच्या हाताला लागलंय म्हणून तो गावाकडे गेलाय ‘अस त्यांना सांगितलं जायचं. मग ते त्याला बोलावून घ्या अस म्हणायचे. पुन्हा विसरून जायचे.त्यांना अलीकडं स्मृतीभ्रंश विकार झालेला. त्यातूनही त्याना अनुपस्थित असलेल्या पैलवानाची आठवण व्हायची, आयुष्यभर हा माणूस फक्त कुस्ती जगला आणि कुस्तीशिवाय कोणताही विचार केला नाही.

कुस्तीत महाराष्ट्राची सोनेरी हॅटट्रिक

कुंडलच्या मैदानात जेव्हा आबांची एंट्री व्हायची तेव्हा कुस्ती समालोचक शंकर पुजारी जोराने म्हणायचे,”….आणि याच समयाला साठचे हिंदकेसरी आणि बासष्ठचे अर्जुनवीर हिंदकेसरी गणपतराव आंधळकर येत आहेत….”आबा जेव्हा आखाड्यात यायचे तेव्हा खाली वाकून लाल मातीच दर्शन घ्यायचे. नंतर उपस्थित कुस्तीशौकिनाना हात उंचावून अभिवादन करायचे. पुढं वाजणारी हलगी आणि पाठीवर हात बांधून चालणारे आबा हे चित्र पहायला खूप बरं वाटायचं.आबा आखड्यातून चालायचे तेव्हा टाळ्यांचा एक कडकडाट व्हायचा. अलीकडच्या दोन वर्षात आबांचे कुस्तीसाठी जाणं कमी झालं होतं पण मोठ्या मैदानावर ते गेले तर लोक डोळं भरून त्याना बघत होती,त्यांच्या पाया पडत होती.एकाद्या सुप्रसिद्ध अभिनेत्याला जे वलय लाभलं होतं तेच त्याना लाभलं होतं.

राजर्षी शाहू महाराज – सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ

आबा ज्या दिवशी गेले त्यादिवशी त्यांच्या पुनवत गावात दुरदुरुन लोक आलेले.सगळं गाव दुःखात होत,बाहेरून आलेले वयस्कर पैलवान पार्थिवाचे दर्शन घेतल्यावर धोतराच्या सोग्याने डोळे पुसत होतं. आबांच अस शांत झोपून राहणं त्याना सहन होत नव्हतं.आणि तेवढ्या गर्दीतही वस्तादांच्या हातातून मिळालेली छत्री सावरत किसन यादवही एखादी लाखमोलाची वस्तू जपावी अस छत्री पोटासंग धरून निघालेले.सोन्याचा ऐवज जपावं असं चाललेले.

संपत मोरे यांच्या फेसबुक वॉल वरून साभार

Leave a Comment