नऊ दिवस नऊ देवी | प्रणव पाटील
महाराष्ट्रात जखिण, जाखीण या देवीला भितीदायक अथवा भूत देवता मानलं जातं आणि या जखिणी बाबत अनेक गैरसमज समाजा मधे आहेत. उदा. जखिण म्हणजे एक स्त्री भूत असून ते माणसाच्या मागे लागतं इ. अशा अनेक दंतकथा जखिणी बाबत वेगवेगळ्या भागात अढळतात. हे सगळे गैरसमज कसे चूकीचे आहेत आणि जखिण उर्फ यक्षिणी ही देवी कशी सुफलतेची एक सुंदर देवी आहे ते आज आपण पाहणार आहोत.
जखिणी हा यक्षिणी शब्दाचा आपभ्रंष असून ही यक्षिणी म्हणजेच यक्ष स्त्री. अाता यक्ष म्हणजे काय तर यक्ष ही वेद, उनिषद, महाभारत यात वर्णन केलेली अतीमानव योनी आहे. म्हणजे यक्ष ही कोणतीही भुताटकी नसून ते मनुष्यच होते. मेघदूत हे कालिदासाचं काव्य तर शापित यक्षावरच आधारीत आहे. यक्ष संस्कृती भारततात वेदपूर्व काळा पासून पसरलेली असून कुबेर, ब्रह्मदेव हे सुध्दा यक्षच आहेत. यक्ष पूजा ही वैदिक संस्कृती पेक्षा ही जूनी आहे. पुढे यक्षांना शूद्र रुप देण्यात आले. यक्षांची निर्मिती कश्यप व विश्वा यांच्या पासून झाली असे मानन्यात येते.
यक्षां बद्दल समाजात अनेक प्रवाह अाढळतात. काही पुराण कथांनुसार यक्ष हे मनुष्यभक्षक आहेत. ते पाण्याचे स्त्रोत, वनस्पती, जंगले यांचे रक्षक असून ते तलाव, उद्याने, जंगले यांमधे निवास करतात. महाराष्ट्रात हरिती देवीची पूजा करण्याची पध्दत आहे. हरित देवी ही बालरक्षक असून लहान बाळांना वाचवते आणि दिर्घाआयुष्य देते असे म्हटले जाते. ही हरीती देवी सुध्दा यक्षिणीच आहे. कामसुत्रात वर्णन केल्या प्रमाणे दिवाळी सारखा सण सुध्दा यक्ष संस्कृतीचीच देण आहे.
यक्षिणींचा विचार करता पुराण कथांमधे ६४ यक्षिणींचे वर्णन आले असून त्यातील एका यक्षिणीचे कोकणात कुडाळ तालुक्यात माणगाव येथे मंदिर आहे. यक्षिणीच्या मूर्ती मंदिरे, लेण्या, स्तूप यांवर कोरलेल्या अाढळतात. यक्षिणींच्या मूर्ती या सौंदर्य व कामुकता दर्शवणार्या असतात. या मूर्ती विशेषतः फळे लगडलेल्या झाडांना, वेलींना टेकून असलेल्या यक्षिणींच्या स्वरुपात अढळतात. भारहूत आणि मथुरेत अशा चांगल्या अवस्थेतील मोठ्या मूर्ती आहेत.
जैन पंथात व बौध्द धर्मात अनेक यक्ष- यक्षिणींची पूजा होते. मणिभद्र हा यक्ष जैन पंथात अत्यंत पूजनीय आहे. जैन धर्म ग्रंथात यक्ष – यक्षिणी तीर्थंकरांचे सेवक असल्याचं म्हटलं आहे. तर बौध्द धर्मातील अनेक लेण्यांमधे, स्तूपांवर यक्षिणींच्या मूर्ती कोरलेल्या अढळतात. महाराष्ट्रात कराड जवळ जखिणवाडी (यक्षिणी चं अपभ्रंषरुप) आहे. तीथे यक्षिणी असलेल्या अनेक बौध्द लेण्या ही आहेत. पितळखोरे लेण्यांमधे यक्ष -यक्षिणींच्या एकत्रित शिल्पे अाढळतात.
यक्षिणी या खरे तर सुफलतेच्या, धन -धान्य, सौंदर्याच्या देवी असून कालांतराने त्यांना जखिण रुपात भूताटकी रुपात गैरसमजातून समाज मनात पसरवाण्यात आलं.
प्रणव पाटील
9850903005
(लेखक इतिहासाचे अभ्यासक असून आय.एल.एस महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेत आहेत).
संदर्भ –
1) देवीकोष खंड ३
2) गाजती दैवते – पं.महादेवशास्त्री जोशी
3) भारतीय संस्कृती कोष खंड ७
4) मराठी विश्वकोष खंड
5) Myth and reality – d.d.kosamabi
6) Yaksha and yakshini – shriniwas bhat