कराड | खुन्नसच्या कारणावरुन हॉटेल व्यावसायिक युवकाला धारदार चाकुने भोसकले. शहरातील बुधवार पेठ येथील चर्चनजीक सोमवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी चौघांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सुदर्शन यादव, सार्थक सुतार यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. चाकुहल्ल्यात जखमी झालेल्या विशाल श्रीकांत घोडके (रा. रैनाक गल्ली, कराड) याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील शनिवार पेठेतील रैनाक गल्लीमध्ये राहणाºया विशाल घोडके याचे हॉटेल आहे. त्याचा सुदर्शन यादव व सार्थक सुतार या दोघांशी जुना वाद होता. सोमवारी सकाळी विशाल हा शहरातील बुधवार पेठेतील चर्चजवळून निघालेला असताना सुदर्शन व सार्थक समोरुन आले. त्यांनी विशालकडे खुन्नसने पाहिले. त्यावेळी खुन्नसने काय पाहताय, अशी विचारणा केल्यामुळे चिडून जाऊन सुदर्शन, सार्थक यांच्यासह अन्य दोघांनी विशालवर चाकुहल्ला केला.
संशयित आरोपींनी धारदार चाकुने विशालच्या छातीत भोकसले आहे. तसेच विशाल गंभीर जखमी झाल्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. परिसरातील नागरीकांनी जखमी विशालला उपचारार्थ रुग्णालयात हलवले. त्याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबतची नोंद कराड शहर पोलिसात झाली आहे.