Tuesday, February 7, 2023

नागेश्वरवाडीत घरात आग; 15 लाखांचे साहित्य जळून खाक

- Advertisement -

औरंगाबाद – शहरातील नागेश्वरवाडी, निराला बाजार परिसरातील एका घरात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत 15 लाखांचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना काल दुपारच्या सुमारास घडली. अग्निशमन विभागाचे बंब काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले. जवानांच्या एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

याविषयी अधिक माहिती अशी की, प्रवीण भरतलाल जैस्वाल यांचे सुंदरनगर नागेश्वरवाडीत घर आहे. काल दुपारी या घराच्या पहिल्या मजल्यावरील बेडरूममध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. या वेळी त्यांचे वडील खालच्या मजल्यावर होते. वरच्या मजल्यावर कोणी नसल्याने आगीचा प्रकार लवकर लक्षात आला नाही. बेडरूममधून धुराचे लोट बाहेर आल्याचे दिसल्याने शेजाऱ्यांनी जयस्वाल यांना माहिती दिली. तसेच आग विझवण्यासाठी धाव घेतली. अग्निशमन दलाला देखील माहिती कळविण्यात आली. पदमपुरा येथून महापालिकेच्या अग्निशमन दलाचा एक बंब अवघ्या दहा मिनिटांत घटनास्थळी दाखल झाला. जवानांनी आग आटोक्यात आणली तोपर्यंत घरातील टीव्ही, फ्रिज, एसी, लाकडी फर्निचर घरगुती साहित्य जळून खाक झाले होते. यात सुमारे पंधरा लाखांचे नुकसान झाले असून 50 हजारांची रोकड वही जळून खाक झाल्याचे जयस्वाल यांनी सांगितले.

- Advertisement -

ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी आर के सुरे, अग्निशमन अधिकारी शरद घाटेशाही, ड्युटी इन्चार्ज संजय कुलकर्णी, जवान विक्रम भुईगळ, शुभम आहेरकर, सुजित कल्याणकर, अक्षय नागरे, इरफान पठाण, वाहनचालक सय्यद सय्यद यांनी परिश्रम घेतले. या घटनेची नोंद क्रांती चौक पोलिस ठाण्यात केल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक गणपत दराडे यांनी दिली आहे.