जाणून घ्या, कसे करावे पावसाळ्यात कोंबड्यांचे व्यवस्थापन 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। हवामान जसे बदलते तसे पोल्ट्री व्यवसायिकांना आपल्या कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल करावा लागतो. प्रत्येक ऋतूत वेगवेगळे व्यवस्थापन करावे लागते. आज आपण पावसाळ्यात काय व्यवस्थापन करावे याची चर्चा करूया. पावसाळी वातावरणामुळे कोंबड्यांना आजार होण्याची शक्यता असते. पोल्ट्री शेडवरील पत्रे मजबूत बांधून घेणे आवश्यक असते.  म्हणजे जेणेकरून जोरात हवा, वावटळ किंवा पाऊस झाला तरी ते हलणार नाहीत, उडून जाणार नाहीत. याबरोबरच पोल्ट्री शेडच्या सभोवतालची दलदल, गवत काढून टाकणे. परिसरातील जागा स्वच्छ ठेवणे, पावसाचे पाणी साठून राहू नये म्हणून खड्डे बुजवून घेणे, पाणी वाहून जाण्यासाठी शेडच्या बाजूने चर खोदणे हे देखील तितकेच आवश्यक आहे.

पावसाळ्यामध्ये  पोल्ट्रीला  शक्यतो प्लॅस्टिकचे पडदे वापरावे हे पडदे शेडच्या बाजूच्या लोखंडी जाळीला दोरीने मजबूत बांधलेले असावेत. म्हणजे त्यांची उघडझाप पावसाप्रमाणे करता येऊ शकेल. दिवसा पाऊस नसेल आणि सूर्यप्रकाश असेल तर पडदे उघडाता येतील. पडद्यांची बांधणी ही छताच्या पायापासून ते दीड फूट अंतर सोडून असावी. यामुळे शेडमधील वरील बाजूने शेडमध्ये हवा खेळती राहून वातावरण चांगले राहते. पक्ष्यांना त्रास होत नाही. पक्ष्यांची गादी (लिटर) दिवसातून किमान एक वेळातरी चांगली खाली-वर हलवून घ्यावी. ओल्या गादीमुळे शेडमधील वातावरण दूषित होते. ओलसर गादीमध्ये रोगजंतूंची वाढ होते, पक्षी रोगास बळी पडण्याची शक्यता असते. चुकून गादी जास्त प्रमाणात ओली झालेली असेल, तर गादीचा तेवढाच भाग काढून बाहेर टाकावा, त्या ठिकाणी नवीन गादी टाकावी.

गादीतील आर्द्रतेमुळे कॉक्सीरडीऑसीस रोगाचे एकपेशीय जंतूंचे प्रमाण वाढते. गादीतील आर्द्रता कमी करण्यासाठी शिफारशीनुसार चुना मिसळावा. शेडमध्ये माश्यां चा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी. खाद्य ठेवण्याची जागा स्वच्छ व कोरडी असावी. खाद्यांच्या गोण्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये गाठी झाल्यास असे खाद्य पक्ष्यांना देऊ नये. कोंबडी खाद्य तपासून घ्यावे. पावसाळ्यात पाणी दूषित होण्याची शक्येता जास्त असते. ब्रॉयलर कोंबड्यांना अशुद्ध पाणी दिले तर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. कोंबड्यांना द्यावयाच्या पिण्याच्या पाण्यामध्ये शिफारशीत जंतुनाशके योग्य प्रमाणात मिसळावीत. पाण्याची टाकी लोखंडी असल्यास ती गंजू नये म्हणून तिला आतून व बाहेरून रेड ऑक्सायईड लावून घ्यावे. भिंत सिमेंट विटांनी बांधलेली असेल तर आतून व बाहेरून चुना लावावा.  हवामान बदलानुसार कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल करावा. हिवाळ्यात पोल्ट्री शेड आणि बाह्य वातावरणातील तापमानात गारवा निर्माण झाल्यामुळे कोंबड्यांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतात. हे लक्षात घेऊन थंडीच्या काळात व्यवस्थापनामध्ये बदल करावेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like