पती व प्रेयसीकडून हल्ला : अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या पत्नीवर कोयत्याने वार

सातारा | अनैतिक संबंधाला विरोध करत असल्याच्या रागातून पतीनेच प्रेयसीच्या मदतीने पत्नीवर जीवघेणा हल्‍ला केल्याची घटना घडली. याबाबत पती व तिच्या प्रेयसीवर वाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाई शहरातील फुलेनगर येथे हल्याची घटना घडली. संशयित पती सिकंदर आमीन आतार (रा. फुलेनगर) व त्याची प्रेयसी संतोषी पिसाळ (रा. व्याजवाडी, ता. वाई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे. याप्रकरणी तन्झीला सिकंदर आतार (वय 30, रा. फुलेनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहीती अशी, रविवारी सिकंदर याने भाजी मंडई परिसरात तन्झीला यांना शिवीगाळ करत धक्‍काबुक्‍की केली. त्यानंतर चित्र टॉकीजच्यासमोर सिकंदर याने तन्झीला हिचे पकडले याचवेळी संतोषी हिने तन्झीला यांच्यावर कोयत्याने वार करून जखमी केले. यानंतर दोघांनीही तन्झीला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

यावेळी त्यांनी आरडाओरडा केल्यामुळे नागरिक जमा झाले. त्यामुळे सिकंदर व संतोषी यांनी तेथून पळ काढला. कोयत्याने वार केल्याने तन्झीला या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.