धक्कादायक ! मुलं नातेवाईकांकडे जाताच तरुणाने केली बायकोची निर्घृण हत्या

नवी मुंबई : हॅलो महाराष्ट्र – नवी मुंबईतील नेरुळ या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये आरोपीने आपली दोन्ही मुले नातेवाईकांकडे गेल्याची संधी साधून आपल्या बायकोची गळा दाबून निर्घृण हत्या केली. एवढेच नाहीतर आरोपीने बायकोच्या माहेरी जाऊन विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्नदेखील केला. या प्रकरणी आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे. कविता वाघ असं हत्या झालेल्या 30 वर्षीय विवाहित महिलेचं नाव आहे. तर पती रमेश वाघ असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पतीचं नाव आहे.

आरोपी रमेशला हा नवी मुंबईतील नेरूळ परिसरातील रहिवासी असून त्याला दारूचे मोठ्या प्रमाणात व्यसन होते. कविता आणि रमेश यांना दोन मुले आहेत. पण रमेश हा दारूच्या आहारी गेल्याने त्याच्यात आणि कविता यांच्यात सतत भांडण होत होते. अगदी क्षुल्लक कारणावरूनही या दोघांमध्ये भांडण व्हायचे. घटनेच्या दिवशीसुद्धा कविता आणि रमेश यांच्यात जोरदार भांडण झाले होते. पण यावेळी त्यांची दोन्ही मुलं घरी नव्हती. ती दोघंही एका नातेवाईकाच्या घरी गेले होती.

हि संधी साधून आरोपी रमेशने आपल्या बायकोची गळा दाबून निर्घृण हत्या केली. यानंतर त्याने स्वतः पत्नीच्या माहेरी फोन करून आपण पत्नीची हत्या केल्याची माहिती दिली. यानंतर आरोपीने मृत महिलेच्या माहेरी नाशिकला जाऊन विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर मृत महिलेच्या माहेरच्या लोकांनी तातडीने आरोपी रमेश याला रुग्णालयात दाखल केलं. याठिकाणी आरोपीवर उपचार केले जात आहेत. तर दुसरीकडे, कविता यांना पतीने मारल्याची माहिती मिळताच त्यांच्या बहिणीनं नेरूळला जाऊन त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल पण त्यागोदरच कविताचा मृत्यू झाला होता. यानंतर कविताच्या बहिणीने आरोपी रमेश विरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.