साताऱ्यात विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पती, सासूवर गुन्हा दाखल

सातारा | शारीरिक व मानसिक त्रास देवून एका महिलेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती आणि सासूवर गुन्हा दाखल झाला आहे. पती गणेश खांडेकर आणि सासू सुवर्णा खांडेकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती. दरम्यान, आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव शुभांगी गणेश खांडेकर (वय -26, रा. 587, मंगळवार पेठ, सातारा) असे आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सविता सुनील मळेकर (वय- 40, रा. सर्व्हे नंबर 24, बोपोडी, पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांची मुलगी शुभांगी यांचा विवाह गणेश विष्णू खांडेकर याच्याशी झाला आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी त्यांना माहिती मिळाली की त्यांची मुलगी शुभांगी यांनी तिच्या मंगळवार पेठेतील राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली आहे. त्यामुळे त्या पुण्यातून सातारा येथे आल्या असता शुभांगी यांनी गळफास लावून आत्महत्या केली असल्याची त्यांची खात्री झाली.

यानंतर त्यांनी मंगळवार, दि. 12 रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात येवून तक्रार दिली आणि पती गणेश विष्णू खांडेकर आणि सासू सुवर्णा विष्णू खांडेकर (रा. 587, मंगळवार पेठ, सातारा) या दोघांकडून शुभांगी हिला शारीरिक व मानसिक त्रास दिल्यामुळेच तिने आत्महत्या केल्याचा आक्षेप घेतला आहे. या तक्रारीनंतर शाहुपूरी पोलीस ठाण्यात गणेश आणि सुवर्णा या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम करत आहेत. दरम्यान, घटनास्थळी सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी भेट दिली आणि संबंधित अधिकाऱ्यांना तपासाबाबत अधिक सूचना केल्या.

You might also like