मुंबई । नालासोपारा पूर्वेकडील एव्हरशाईन सिटीमध्ये राहणाऱ्या एक दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. पैशांच्या चणचणीमुळे या दोघांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. तुळिंज पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनसाठी पाठवले आहे. पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास करत आहे.
नालासोपारा पूर्वेकडील एव्हरशाईन सीटीमधील सेक्टर नंबर ४ मध्ये राहुल धना चव्हाण (२८) आणि ज्योती राहुल चव्हाण (२३) हे दांपत्य राहात होते. त्यांचे दीड वर्षांपूर्वी लग्न झाले होते. राहुल हा मेट्रोमध्ये गार्डची नोकरी करायचा. १८ हजार रुपये येणाऱ्या पगारात घरातील खर्च भागत नसल्याने पैशांवरून दोघांमध्ये वाद होत असल्याचे सूत्रांकडून कळते. अखेर याच कारणानं त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
अन दरवाजा तोडताच…
शेजारच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या मावशीला संध्याकाळी घरात लाईट पेटली नसल्याने संशय आला. घर आतून बंद असल्याने दरवाजा तोडल्यावर या दोघांचे मुतदेह घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळले. रात्री साडेअकराच्या सुमारास मावशीने तातडीने तुळिंज पोलिसांना घटनेची माहिती दिली. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून त्यांचा अहवाल आल्यावर नक्की कारण कळेल, अशी माहिती तुळिंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे.बी. सूर्यवंशी यांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी वसई पूर्वेकडील भोयदापाडा गावात राहणाऱ्या पती व पत्नीने जेवणातून विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in