जनता संकटात असताना मी देश सोडून जाणार नाही; युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेचा प्रस्ताव नाकारला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया आणि युक्रेन मध्ये गेल्या 2 दिवसांपासून जोरदार युद्ध सुरू असून आज तिसरा दिवस आहे. रशियाने युक्रेनमध्ये आपलं सैन्य घुसवले असून ठिकठिकाणी हल्ले सुरूच आहेत. याच दरम्यान, काहीही झालं तरी आपण युक्रेन सोडून जाणार नाही अस युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी म्हंटल आहे.

रशियन सैन्य आता युक्रेनची राजधानी किव्ह येथे पोहोचले आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांना किव्ह सोडण्यास सांगितले. पण त्यांनी अमेरिकेचा प्रस्ताव धुडकावून लावला. काहीही झाले तरी मी देश सोडून जाणार नाही, माझी जनता संकटात असताना मी जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही असे त्यांनी म्हंटल.

दरम्यान, रशियन सैन्याने शुक्रवारी युक्रेनची राजधानी किव्हवर हल्ला केला तसेच सरकारी निवास स्थानांजवळ गोळ्या झाडल्या. या युद्धात आत्तापर्यंत अनेक लोकांचे प्राण गेले आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. युक्रेनचे नागरिक भीतीपोटी देश सोडण्याची तयारी करत आहेत.