‘क्रिकेट वर्ल्ड कप’ दर ३ वर्षांनी? बीसीसीआय-आयसीसी मध्ये वादाची ठिणगी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । आयसीसी च्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा कालावधी ठरलेला असतो. त्यानुसार एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा दर चार वर्षांनी तर टी २० स्पर्धा दर दोन वर्षांनी खेळवली जाते. आता मात्र टी २० विश्वचषक स्पर्धा दरवर्षी आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा दर ३ वर्षांनी आयोजित करण्याचा विचार आयसीसी करत आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून आयसीसी आणि बीसीसीआय यांच्यात मतभेद होताना दिसून येत आहेत.

आयसीसी च्या नव्या एफटीपी (फ्यूचर टूर प्रोग्राम) वर बीसीसीआय ने नाराजी व्यक्त केली आहे. या नव्या कार्यक्रमाअंतर्गत एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा दर चार वर्षांऐवजी दर तीन वर्षांनी तर टी २० विश्वचषक स्पर्धा दरवर्षी भरवण्यात यावी, असा प्रस्ताव आयसीसी ने ठेवला आहे. पण बीसीसीआय ला मात्र हा प्रस्ताव अजिबात मान्य नाही. २०२३ ते २०२८ या कालावधीत जगभरातील मीडिया विश्वात जास्तीत जास्त प्रायोजकत्व मिळवणे आणि त्या माध्यमातून अधिकाधिक कमाई करणे हा या नव्या प्रस्तावामागील हेतू आहे असे बोलले जात आहे.

बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी एक पत्र लिहून आयसीसी कडे आपली नाराजी व्यक्त केली आहे. २०२३ च्या नंतर आयसीसीच्या ज्या स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत त्या प्रस्तावाला ‘बीसीसीआय’चा पाठिंबा नाही. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मंडळाच्या निवडणुकांनंतर ‘आयसीसीच्या या प्रस्तावावर चर्चा करून या निर्णयावर ठोस पावलं उचलण्यात येतील. मात्र टी २० क्रिकेट स्पर्धा दरवर्षी भरवणे हे रोमांचक असेल असेही त्या अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान आयसीसी जर हा प्रस्ताव घेऊन माध्यमविश्वात गेली, तर राजस्व हक्कासाठी मिळणारा मोठा आर्थिक वाटा हा आयसीसीला जाऊ शकतो. त्यामुळे बीसीसीआय या मुद्द्याला विरोध करत असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Comment