इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या दुरुस्तीसाठी 18 कोटी रुपये मंजूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर

इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या इमारतीची आणि कर्मचारी निवासस्थान दुरुस्तीसाठी 18 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तत्कालिन आमदार सुरेश हाळवणकर यांच्या काळात हा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला होता. बुधवार दिनांक 4 मार्च रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

इचलकरंजी नगरपालिकेच्या इंदिरा गांधी स्मृति रुग्णालयाचे 30 जून 2016 च्या शासन निर्णयाद्वारे आरोग्य विभागाकडे हस्तांतर करण्यात आले होते. त्यानंतर या इमारतीची मोठी दुरावस्था झाली असल्याने दुरुस्तीसाठी आणि कर्मचारी वसाहतीच्या दुरुस्तीसाठी निधी देण्याची मागणी तत्कालीन आमदार सुरेश हाळवणकर यांनी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील तसेच आरोग्य मंत्री यांच्याकडे वेळोवेळी केली होती.

त्यानुसार हातकणंगले येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रुग्णालयाचे अंदाजपत्रक करण्यात आले होते. हे अंदाजपत्रक सादर केल्यानंतर हळवणकर यांनी माजी मंत्री ना.पाटील यांच्याकडे अर्थसंकल्पात यासाठी निधीची तरतूद करण्याची मागणी केली होती.

तथापि तांत्रिक दुरुस्तीसाठी सदरचे अंदाजपत्रक पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवण्यात आले होते. या कामाची मंजुरी रखडल्याने 18 जून 2019 रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन दरम्यान पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मुंबई येथील विधान भवनात सार्वजनिक बांधकाम विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या अधिकाऱ्यांसह बैठक घेऊन अंदाजपत्रकाला त्वरित निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. तसेच तातडीच्या दुरुस्तीसाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. या निधीतून रुग्णालयातील काही भागातील रंगरंगोटी, स्वच्छतागृहे दुरुस्ती, फरशी बदलणे, पाण्याची व्यवस्था यासारखे कामे करण्यात आली आहेत.

आता रुग्णालयाच्या दुरुस्तीसाठी 13.35 कोटी तर कर्मचारी निवास स्थानाच्या दुरुस्तीसाठी 4.92 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. यातून संपूर्ण इमारत आणि कर्मचारी निवासस्थान दुरुस्ती करणे ही कामे करण्यात येतील, अशी माहिती माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिली.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment