ICICI बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अखेर जामीन मंजूर, मात्र परवानगीशिवाय देश सोडता येणार नाही

मुंबई । आयसीआयसीआय बँक (ICICI) ची माजी सीईओ आणि एमडी चंदा कोचर (Chanda Kochhar) शुक्रवारी मुंबईतील आयसीआयसीआय बँक-व्हिडिओकॉन मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात विशेष पीएमएलए कोर्टात हजर झाल्या. चंदा कोचर यांनी त्यांचे वकील विजय अग्रवाल यांच्यामार्फत विशेष न्यायाधीश ए.ए. नांदगावकर यांच्यासमोर जामीन याचिका दाखल केली होती. यावर कोर्टाने ईडीला जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्यास सांगितले. मात्र, नंतर कोर्टाने चंदा कोचर यांना 5 लाखांच्या वैयक्तिक बाँडवर सशर्त जामीन मंजूर केला. तसेच कोर्टाने असेही म्हटले आहे की,” परवानगीशिवाय त्यांना देश सोडता येणार नाही.”

अंमलबजावणी संचालनालया (ED) कडून आरोपपत्र घेतल्यानंतर 30 जानेवारीला प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अ‍ॅक्ट (पीएमएलए) च्या विशेष कोर्टाने चंदा कोचर, तिचा नवरा दीपक कोचर, व्हिडिओकॉन गटाचे प्रमोटर वेणुगोपाल धूत आणि इतर आरोपींना समन्स बजावले. …. कोचर, धूत आणि इतरांविरूद्ध सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे मनी लाँड्रिंगचा फौजदारी खटला दाखल केला. ज्यानंतर दीपक कोचर यांना ईडीने सप्टेंबर 2020 मध्ये अटक केली होती.

ईडीचा आरोप आहे की, चंदा कोचर यांच्या अध्यक्षतेखालील आयसीआयसीआय बँकेच्या समितीने व्हिडिओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला 300 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले. हे कर्ज मिळाल्याच्या दुसऱ्याच दिवशी व्हिडिओकॉन इंडस्ट्रीजने 8 सप्टेंबर, 2009 रोजी, 64 कोटी रुपये न्यूपॉवर रिन्यूएबल प्रायव्हेट लिमिटेड (NRPL) ला ट्रान्सफर केले. दीपक कोचर हे एनआरपीएलचे मालक आहेत.

गेल्या सुनावणीत नांदगावकर म्हणाले होते की,”पीएमएलए अंतर्गत देण्यात आलेली सामग्री, लेखी तक्रारी आणि नोंदवलेल्या निवेदनातून असे दिसून येते आहे की,चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला आणि आरोपी धूत तसेच व्हिडिओकॉन समूहातील कंपन्यांना कर्ज दिले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like