औरंगाबाद – नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच पहिल्या आठवड्यात औरंगाबाद, जालना वरून मुंबईकडे जाणाऱ्या नंदिग्राम राज्यराणी आणि जनशताब्दी सुपरफास्ट एक्सप्रेस रद्द करण्यात आली असल्याची माहिती मध्य रेल्वेने एका पत्रकाद्वारे कळविली आहे. मध्य रेल्वेने कळवल्या नुसार मध्य रेल्वे मधील कालवा ते दिवा सेक्शन मध्ये ट्राफिक ब्लॉक घेण्यात आल्याने या रेल्वे रद्द करण्यात आल्याची माहिती पत्रकात देण्यात आली आहे. या ट्रॅफिक ब्लॉक मुळे मुंबईकडे जाणाऱ्या व मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांचे मात्र हाल होणार आहेत.
रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये मुंबई सीएसएमटी ते जालना (12071) जनशताब्दी सुपरफास्ट एक्सप्रेस 2, 8 व 9 जानेवारीला तर जालना ते मुंबई सीएसएमटी (12072) जनशताब्दी सुपरफास्ट एक्सप्रेस 2, 8 व 9 जानेवारी ला रद्द असेल. यासोबतच नांदेड ते मुंबई सीएसएमटी (17611) राज्यराणी एक्सप्रेस ही गाडी 1, 7 व 8 जानेवारी तर मुंबई सीएसएमटी ते नांदेड (17612) राज्यराणी एक्सप्रेस ही गाडी 2, 8 व 9 जानेवारी रोजी रद्द असेल.
याबरोबरच मुंबई सीएसएमटी ते आदिलाबाद (11401) नंदिग्राम एक्सप्रेस 2, 8 व 9 जानेवारी रोजी तर आदिलाबाद ते मुंबई सीएसएमटी (11402) नंदिग्राम एक्सप्रेस ही गाडी 3, 9 व 10 जानेवारी रोजी रद्द करण्यात आली आहे. अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील जनसंपर्क विभागाने कळविले आहे. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या व मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांना रेल्वे व ते आरक्षण मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.