Sunday, May 28, 2023

IIP: सप्टेंबरमध्ये औद्योगिक उत्पादन 3.1 टक्क्यांनी वाढले, उत्पादन क्षेत्रात 2.7 टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली । सप्टेंबरमध्ये देशातील औद्योगिक उत्पादन 3.1 टक्क्यांनी वाढले आहे. सप्टेंबर महिन्यात इंडस्ट्रियल प्रोडक्शन इंडेक्स (IIP) 3.1 टक्क्यांनी वाढला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) ही माहिती दिली आहे. इंडस्ट्रियल प्रोडक्शन इंडेक्स अर्थात (Index of Industrial Production) च्या आकडेवारीनुसार सप्टेंबर महिन्यात मॅन्युफॅक्चरींग सेक्टरच्या उत्पादनात 2.7 टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी म्हणजेच सप्टेंबर 2020 मध्ये IIP 1 टक्क्यांनी वाढला होता.

सप्टेंबरमध्ये, खाण क्षेत्रातील उत्पादन 8.6 टक्क्यांनी वाढले, तर वीज उत्पादन सुमारे 0.9 टक्क्यांनी वाढले. या वर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत औद्योगिक उत्पादनात 23.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे, जी गेल्या वर्षी याच कालावधीत 20.8 टक्क्यांनी घटली होती.

कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी औद्योगिक उत्पादनावर वाईट परिणाम झाला आणि संपूर्ण वर्षभरात त्यात 18.7 टक्के घट नोंदवली गेली. त्याचवेळी, कोरोना महामारीमुळे देशात पहिल्या लॉकडाऊननंतर एप्रिल 2020 मध्ये औद्योगिक उत्पादनात 57.3 ची घट नोंदवली गेली.

मार्च 2021 पासून, या कमी आधारभूत प्रभावामुळे, IIP मध्ये स्थिर वाढ होत आहे. उदाहरणार्थ, IIP ने जूनमध्ये 13.6 टक्के, मेमध्ये 27.6 टक्के आणि एप्रिलमध्ये विक्रमी 134 टक्के वाढ नोंदवली. त्याच वेळी, ऑगस्टमध्ये IIP मध्ये 11.9 टक्के वाढ नोंदवली गेली.