तौक्तेचा परिणाम? नाथसागर जलाशयातील हजारो माशांचा अचानक मृत्यू!

पैठण | नाथसागर जलाशयात साखळी क्रमांक ८० ते८५ या दरम्यान मोठ्या प्रमाणावर मासे मृत्यू पावल्याची घटना काल सायंकाळी समोर आली.

हजारो विविध प्रकारचे मासे अचानक मृत्यू मुखी पडल्याचे दिसून दिसल्याने अनेक नागरिकांनी नाथ सागर जलाशयाकडे धाव घेतली. त्याठिकाणी मासे गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. मासे नेमके कशामुळे मृत्यूमुखी पडले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र तौक्ते वादळामुळे तर हे मासे मृत्युमुखी पडले असतील का असा सवाल उपस्थित होत आहे.
नाथ सागर जलाशयाच्या उत्तर बाजूस साखळी क्रमांक ८०ते ८५ या दरम्यान सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या दरम्यान पाण्यात अचानक मासे किनाऱ्यावर येऊन धडकू लागले.

यामध्ये वाम, मोठे झिंगे, जलवा, पापलेट, टीलापी, चुचीचे मासे, मुरी वाम, चिंगल्या, भतका, कढई या विविध प्रकारचे मासे होते. मासे किनाऱ्यावर येऊ लागल्याचे दिसताच नागरिकांची मासे गोळा करण्यासाठी झुंबड उडाली. माशांची पारख असलेल्या नागरिकांनी मोठे झिंगे, वाम, जलवा आदी बिन काट्याचे मासे गोळा करून घरी नेले. रविवार असल्याने या खवय्यांची चांगलीच मेजवानी झाली. मात्र हे मासे कशामुळे मृत्युमुखी पडले असतील याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे.

दरम्यान हवामानात अचानक बदलामुळेही ही मासे मृत्युमुखी पडली असतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. वातावरणातील बदलांमुळे माशांना रिएक्शन येते भुरळ येते ते भुरळ येऊन मृत्युमुखी पडतात असे बोलले जात आहे. त्यामुळे तौक्ते वादळाचाच हा परिणाम असावा. अशी शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

You might also like