जालना जिल्ह्यात तब्ब्ल १५१ ग्रामपंचायतीने केले ‘या’ साठी आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जालना : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास सुविधा मिळावी यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळात प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा वसतिगृह सुरू करण्यात आले होते. यातील काही जिल्ह्यातील वसतिगृहाचे काम सुरू असतानाच निवडणूक आचारसंहिता लागली होती. त्यामुळे वसतिगृह सुरू होवू शकले नाही. मात्र, निवडणुकीनंतर सत्तांतर झाल्यामुळे हा विषय मागे पडला. यातील जालना जिल्ह्यातील मराठा वसतिगृहाच्या नियोजित जागेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. हा मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय असल्याचा आरोप जालना भाजपच्या वतीने करण्यात आलाय. या संदर्भात जालना जिल्ह्यातील १५१ ग्रामपंचायतीमध्ये निषेध आंदोलन करण्यात आले.

राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये नियोजित असलेली ही मराठा वसतिगृहे तत्काळ सुरू करण्याची मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही पाठवले आहे. तसेच जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या विरोधात आंदोलन करुन तत्काळ वसतिगृह सुरू करण्याची मागणी केली आहे.

जालना जिल्ह्यात या आंदोलनाचे पडसाद उमटले असून राज्य सरकार आणि पालकमंत्री राजेश टोपे यांच्या विरोधात १५१ ग्रामपंचायतींमध्ये आंदोलन करण्यात आले. जालना जिल्ह्यातील मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी नियोजित वसतिगृह तत्काळ सुरू करावे तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यातील मराठा वसतिगृहे सुरू करण्यात यावीत अशी मागणी या वेळी करण्यात आली.

Leave a Comment