परळीत वृद्ध बहिण-भावाची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या

परळी : हॅलो महाराष्ट्र – परळीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये परळी तालुक्यातील जिरेवाडी शिवारात वृद्ध बहिण-भावाची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. हि घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली आहे. सटवा ग्यानबा मुंडे आणि शुभ्रा ग्यानबा मुंडे अशी हत्या करण्यात आलेल्या बहिण-भावाची नावे आहेत.

परळी तालुक्यातील जिरेवाडी शिवारात नदीलगत मृत सटवा मुंडे यांचे शेत आहे. याच शेतामध्ये दोघा बहिण-भावाची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. परळी ग्रामीण पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवले. हि हत्या नेमकी कशामुळे करण्यात आली हे अजून समजू शकले नाही. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

या प्रकारे झाला खुलासा
मृत सटवा मुंडे यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा आहे. तर शुभ्रा मुंडे यांचे पतीबरोबर जमत नसल्याने त्या कायम आपल्या भावाकडेच राहत होत्या. हे दोघेही बहिण-भाऊ शेती व्यवसाय सांभाळत होते. दिवसभर दोघेही शेतात काम करायचे. दुपारी जेवणासाठी आणि रात्री झोपण्यासाठी केवळ घरी यायचे. घटनेच्या दिवशीहि नेहमीप्रमाणे दोघे शेतात काम करण्यासाठी घरुन निघून गेले. मात्र दुपारी जेवणाची वेळ झाली तरी दोघे घरी जेवायला आले नाहीत. त्यामुळे जेवायला का आले नाही बघायला सटवा यांचा मुलगा शेतामध्ये गेला. यावेळी सटवा आणि त्यांची बहिण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. यानंतर परळी ग्रामीण पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. या दोघां बहीण भावांची हत्या झाल्याने संपूर्ण गाव हादरले आहे.