सातारा जिल्ह्यात कोरोना लस न घेता प्रवाशांची वाहतूक करणाऱ्यास बसणार अर्थिक दंड

सातारा |  सातारा जिल्ह्यात सार्वजनिक, खाजगी वाहनातून प्रवास करण्यासाठी 18 वर्षावरील सर्व वाहन चालक-मालक व प्रवासी यांनी त्यांचे कोविड लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे. तरी सातारा जिल्ह्यातील सर्व खाजगी, सार्वजनिक प्रवासी वाहन सेवा (ऑटोरिक्षा,टॅक्सी,बस,जीप टाईप वाहने इत्यादी) पुरविणाऱ्या सर्व वाहन चालक-मालक यांनी कोरोना लसीकरण प्रमाणपत्राशिवाय प्रवाशांची वाहतूक करु नये, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केले आहे.

विनोद चव्हाण म्हणाले, सार्वजनिक वाहनातून पुरविणाऱ्या वाहन मालकांनी कोविड अनुरुप वर्तनाचे पालन न केल्यास कसूर करणाऱ्या व्यक्तींना 500/- रुपये इतका दंड व सेवापुरवठादार यांना 500/- रुपये इतका दंड आकारण्यात येईल. तसेच बसेसच्या बाबतीत कसूरीच्या प्रत्येक प्रसंगी 10 हजार रुपये इतका दंड आकारण्यात येईल. वारंवार कर्तव्यात कसूर होत असेल तर कोविड-19 ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत मालक, एजन्सीचे लायसन्स काढून घेण्यात येईल किंवा तिचे परिचालन किमान दोन दिवस बंद करण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी कळविले आहे.

यामुळे आता वाहन चालकांनी लसीकरण करणे आवश्यक असून तसे न केल्यास अर्थिक दंडास सामोरे जावे लागणार आहे. याबाबतची कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्याने आता प्रवाशी वाहतूक करण्यासाठी लसीकरण गरजेचे बनले आहे. अद्यापही अनेक वाहन चालकांनी लसीकरण केले, नसल्याची बाब सामोरे आलेली आहे.

You might also like