उद्योगनगरी औरंगाबादच्या शिरपेचात मनाचा तुरा ! देशातील निर्यातक्षम टॉप 30 जिल्ह्यांत लावला नंबर

औरंगाबाद – देशाबाहेर निर्यात करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये उद्योगनगरी औरंगाबादचे योगदान मोठे आहे. कोरोनाच्या संकटातदेखील उद्योगनगरी औरंगाबादने या क्षेत्रात आपला दबदबा दाखवून दिला. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणानुसार, निर्यातीच्या बाबतीत औरंगाबाद जिल्ह्याने देशात 27 वे स्थान पटकावले आहे. यामुळे उद्योगनगरी औरंगाबादच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला गेला आहे.

देशातील ज्या जिल्ह्यांमधून औद्योगिक निर्यात केली जाते, त्यांची टॉप 30 यादी आकडेवारीसह या मंत्रालयाकडून दरवर्षी जाहीर केली जाते. यंदा एप्रिल 2021 पासून ही प्रक्रिया सुरु करण्यात आली. एप्रिल ते सप्टेंबर या पहिल्याच सर्वेक्षणात महाराष्ट्राने बाजी मारली आहे. निर्यात करणाऱ्या टॉप 30 जिल्ह्यांमध्ये औरंगाबाद 27 व्या स्थानी आहे. गुजरातमधील जामनगर आणि सुरत या दोन जिल्ह्यांनी अनुक्रमे पहिला आणि दुसरा क्रमांक लावला आहे. मुंबई तिसऱ्या स्थानावर आहे. पुणे पाचव्या तर ठाणे 13 स्थानी आहे. रायगड 15 तर पालघर 28 व्या स्थानी आहे.

औरंगाबादमधून मोठ्या प्रमाणावर इंजिनिअरिंगसाठी लागणारी उत्पादने निर्यात होतात. तसेच पैठणी साडी, कापड, मराठवाडा केसर, बीडचे सीताफळ आदींची निर्यात होते. प्लास्टिक व लिनोलिअम, मांस, दूध, कुक्कुट उत्पादने आदींची निर्यात औरंगाबादेतून होते. जिल्ह्याची एकूण निर्यात 1734.22 कोटींची होते.