शरद पवारांना आयकर विभागाने बजावली नोटीस; वेळेत उत्तर न दिल्यास दिवसाला १० हजार रुपयांचा दंड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आयकर विभागाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. यामध्ये शरद पवार यांच्याकडून निवडणुकीच्या प्रतिज्ञपत्रात नमूद केलेल्या माहितीविषयी स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत ही नोटीस असल्याचे समोर आलं आहे.

दरम्यान, आज मुंबईत झालेली पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी सदर नोटिशीबाबत भाष्यही केले. ते म्हणाले की, सुप्रियालाही काल संध्याकाळी नोटीस येणार होती. मात्र, पहिली नोटीस मलाच आली, हे चांगले झाले. निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरून आयकर विभागाने ही नोटीस पाठवल्याचे मला समजले. संपूर्ण देशात आमच्यावर विशेष प्रेम आहे, याचा मला आनंद असल्याची खोचक टिप्पणी यावेळी पवार यांनी केली. तसेच आपण या नोटिसला लवकरात लवकर उत्तर देऊ, असेही पवारांनी स्पष्ट केले. कारण वेळेत उत्तर न दिल्यास दिवसाला १० हजार रुपयांचा दंड भरावा लागेल, असा उल्लेखही संबंधित नोटीसमध्ये असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

तत्पूर्वी शरद पवार यांनी आजच्या पत्रकारपरिषदेत राज्यसभेत कृषी विधेयकांना घाईगडबडीत देण्यात आलेल्या मंजुरीवर टीका केली. कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस चर्चा व्हायला पाहिजे होती. मात्र, सत्ताधारी पक्षाच्या आग्रहामुळे ही विधेयके तातडीने मंजूर करण्यात आली. त्यासाठी सदनाचे कामकाज रेटण्याचा प्रयत्न झाला. आजवर राज्यसभेत असे कधीच घडले नव्हते, अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली. याशिवाय कृषी विधेयकाच्या मतदानाला विरोध करणाऱ्या निलंबित राज्यसभा सदस्यांनी अन्नत्याग केला असून मीदेखील त्यांच्यात सहभागी होत आज दिवसभर अन्नत्याग करणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment