Wednesday, March 29, 2023

नामुष्की व्हाइटवॉशची! दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने केला ७ गडी राखत भारताचा पराभव

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकदिवसीय मालिकेपाठोपाठ कसोटी मालिकेतही २-० असा विजय मिळवून न्यूझीलंडने भारताला व्हाइटवॉश दिला. ख्राईस्टचर्च कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताचा डाव अवघ्या १२४ धावांवर आटोपला. भारतानं दिलेलं १३२ धावांचं लक्ष्य न्यूझीलंडनं ३ गड्यांच्या मोबदल्यात सहज गाठलं. यामुळे वन-डे मालिकेपाठोपाठ कसोटी मालिकेतही भारतीय संघाला पराभवाचं तोंड पहावं लागलं आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतला भारतीय संघाचा हा पहिला मालिका पराभव ठरला आहे.

भारतानं पहिल्या डावात २४२ धावा केल्या होत्या. त्यानंतर गोलंदाजांनी न्यूझीलंडला २३५ धावांवर गुंडाळलं होतं. भारत या कसोटीत वापसी करून कसोटी मालिका बरोबरीत सोडवणार असं वाटलं होतं. मात्र, गोलंदाजांनी कमावलं आणि फलंदाजांनी गमावलं असं चित्र दुसऱ्या डावात पाहायला मिळाल. दुसऱ्या दिवशी ६ गड्यांच्या मोबदल्यात ९० धावांपर्यंत मजल मारलेल्या भारतीय संघाची तिसऱ्या दिवशीही खराब सुरुवात झाली. हनुमा विहारी टीम साऊदीच्या गोलंदाजीवर वॉटलिंगकडे झेल देऊन माघारी परतला. यानंतर ऋषभ पंत, मोहम्मद शमी हे फलंदाजही एकामागोमाग एक माघारी परतले. रविंद्र जाडेजाने फटकेबाजी करत भारताला शतकी आघाडी मिळवून दिली. ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात जसप्रीत बुमराह धावबाद झाला आणि भारताचा दुसरा डाव डाव १२४ धावांत गुंडाळल्यानंतर न्यूझीलंडला विजयासाठी १३२ धावांचं आव्हान मिळालं. न्यूझीलंडकडून दुसऱ्या डावात ट्रेंट बोल्टने ४, टीम साऊदीने ३ तर डी-ग्रँडहोम आणि वँगर यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

- Advertisement -

१३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रापर्यंत न्यूझीलंडने एकही गडी न गमावता ४६ धावांपर्यंत मजल मारली. उपहाराच्या सत्रानंतरही खेळपट्टीवर जम बसवलेल्या लॅथम आणि ब्लंडल जोडीने भारतीय गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत धावफलक हलता ठेवला. यादरम्यान लॅथमने आपलं अर्धशतकही साजरं केलं. अखेरीस १०३ धावांवर उमेश यादवने लॅथमला यष्टीरक्षक पंतकरवी झेलबाद केलं. लॅथमने ५२ धावा केल्या. यानंतर जसप्रीत बुमराहने बाऊंसर चेंडू टाकत कर्णधार विल्यमसनला आपल्या जाळ्यात अडकवलं. यानंतर टॉम ब्लंडलने आपलं अर्धशतक झळकावत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून सोडलं. मात्र ५५ धावांवर खेळत असताना जसप्रीत बुमराहने त्याचा त्रिफळा उडवला. यानंतर अनुभवी रॉस टेलर आणि हेन्री निकोल्स यांनी न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. दुसऱ्या डावात भारताकडून बुमराहने २ तर उमेश यादवने १ बळी घेतले.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.