शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे बेमुदत ठिय्या आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

सांगली जिल्ह्यात गेल्या चार ते पाच वर्षांपासून अवकाळी पासून, महापूर, गारपीट तसेच कोरोनामुळे शेतीला मोठा फटका बसला आहे. एकीकडे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असतानाच दुसरीकडे शेतकऱ्यांना शेतीचे भरमसाठ बिल येत आहे. अशातच वीजबिल भरले नाही तर कोणतीही पूर्वसूचना न देता शेती पंपांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे.

याबाबत महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांकडे पाठपुरावा करून देखील त्यावर कार्यवाही होत नसल्याने रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेनं सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरवात केली आहे. शेती पंपाचा वीजपुरवठा खंडित करु नये, १२ तास वीजपुरवठा करावा, शेतकऱ्यांना वीज मोफत देण्यात यावी, रेडीरेकनर प्रमाणे शेतीसाठी कर्जपुरवठा करावा यांसह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन सुरु करण्यात आले.

शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महादेव कोरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना देण्यात आले. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Comment