Friday, June 9, 2023

कोरोना मृत्यूच्या संख्येत भारत जगात ५व्या स्थानी; इटलीला टाकलं मागे

मुंबई । भारतात कोरोना संसर्गाचा वेग अजूनही कायम असून दिवसेंदिवस कोरोना रुग्ण आणि कोरोना मृत्यूचं प्रमाण वाढत आहे. शुक्रवारी भारतात करोनामुळे झालेल्या मृत्युच्या संख्येत ७७९ इतकी भर पडली. कोरोनामुळे मृत्यु झालेल्या रुग्णांच्या संख्येत भारत आता इटलीला मागे टाकत पाचव्या स्थानी पोहोचला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं माहितीनुसार, गेल्या २४ तासात देशात ५५ हजार ७९ नवीन रुग्ण आढळून आले. तर ७७९ रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १६ लाख ३८ हजार ८७१ इतकी झाली आहे. देशातील करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३५ हजार ७४७ इतकी झाली आहे. धक्कादायक आणि चिंतेची बाब म्हणजे यातील १८००० रुग्णांचा मृत्यू जुलै महिन्यात झाला आहे.

रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येबरोबरच भारत जगात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशांच्या यादीत ५ व्या स्थानी पोहोचला आहे. यापूर्वी ५व्या स्थानी असलेल्या इटलीलाही भारतानं मागे सोडलं आहे. विशेष म्हणजे कोरोनामुळे मरण पावणाऱ्यांच्या एकूण संख्येपैकी ४९ टक्के मृत्यू २० शहरांमध्ये झाले आहेत. इटलीत करोनामुळे आतापर्यंत ३५ हजार १३२ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. या क्रमवारीत पहिल्या पाच अमेरिका (१ लाख ५२ हजार ७०), ब्राझील (९१ हजार २६३), ब्रिटन (४६ हजार ८४) आणि मेक्सिको (४६ हजार) आणि ५ व्या स्थानी भारत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”