Wednesday, February 1, 2023

विराट कोहलीची ‘हि’ मागणी मान्य करून इंग्लंडने स्वतःच्याच पायावर मारला धोंडा!

- Advertisement -

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघातील खेळाडू सध्या २० दिवसांच्या सुट्टीवर गेले आहेत. नुकत्याच झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये त्यांना न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर आता टीम इंडिया ४ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी मैदानावर उतरणार आहे. या मालिकेपूर्वी कर्णधार विराट कोहली याची एक मागणी इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डाकडून मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे आता टीम इंडियाला कसोटी मालिकेत पराभूत करणे यजमान इंग्लंडसाठी आव्हानात्मक असणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर पुरेसा सराव न मिळाल्याची खंत विराटने व्यक्त केली होती. यावेळी त्याने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी आयोजित सराव सामना का रद्द केले, याबाबतही नाराजी व्यक्त केली. त्यानंतर बीसीसीआयने ECBशी पुन्हा चर्चा केली. या चर्चेनंतर भारतीय संघासाठी दोन सराव सामन्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. ECBने चार दिवसीय दोन सराव सामन्यांचे आयोजन करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटपटूंना डरहॅम येथील एमिरेट्स रिव्हरसाईड येथे एकत्र येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

टीम इंडियासाठीचे दोन्ही सराव सामने डरहॅम या ठिकणी खेळवण्यात येणार आहे. पहिला सराव सामना कोणत्या क्लबविरुद्ध होईल, हे अजून ठरले नाही आहे. पण दुसऱ्या सराव सामन्यात टीम इंडियाला कौंटी स्पर्धेतील सर्वोत्तम ११ खेळाडूंचा सामना करावा लागणार आहे. ”टीम इंडियासाठी सराव सामन्याच्या आयोजनासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करूनच हे सामने खेळण्याचा आमचा प्रयत्न आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येईल असे ECBच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे.