Wednesday, October 5, 2022

Buy now

इंडोनेशियाने पाम तेलाच्या निर्यातीवर पूर्णपणे बंदी घातली?? पहा नेमकं काय आहे सत्य?

नवी दिल्ली । पाम तेलाच्या निर्यातीवर इंडोनेशियाने पूर्ण बंदी घातल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती, मात्र प्रत्यक्षात तसे नाही. पाम तेलाचा सर्वात मोठा उत्पादक देश असलेल्या इंडोनेशियाने आपली निर्यात पूर्णपणे थांबवलेली नाही. इंडोनेशियाने फक्त प्रोसेस्ड पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. तसेच कच्चे पामतेल आणि आरबीडी पाम तेलाची निर्यात सुरूच राहील, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

शुक्रवारी पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घातल्याची घोषणा इंडोनेशियन सरकारने केली होती. सरकारने यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले गेले होते की,” ही बंदी 28 एप्रिलपासून सुरू होईल आणि देशांतर्गत तेलाची टंचाई पूर्ण संपेपर्यंत ती सुरूच राहील.” या घोषणेनंतर बाजारपेठेत एकच खळबळ उडाली होती. इंडोनेशियाच्या या निर्णयाचा फटका भारतासारख्या देशांना बसेल. कारण भारत आपल्या गरजेच्या एकूण 60 टक्के खाद्यतेलाची आयात करतो.

पाम तेल कसे तयार केले जाते हे जाणून घ्या
पाम तेल तयार करण्यासाठी पाम वृक्षाच्या फळांना जमिनीवर रगडले जाते. यानंतर त्यावर प्रक्रिया केली जाते. याद्वारे रिफाइंड, ब्लीचड, डिओजोराइज्ड पाम तेल मिळते. त्यानंतर आरबीडी पाम तेल तयार करण्यासाठी त्यावर पुढील प्रक्रिया केली जाते. याचा वापर स्वयंपाकाचे तेल आणि उद्योगांमध्ये प्रोसेस्ड फूड बनवण्यासाठी केला जातो.

इंडोनेशिया मध्ये अशांतता
इंडोनेशिया सध्या अशांततेत आहे. इंडोनेशियामध्ये मुस्लीम लोकांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि सध्या सुरु असलेल्या ईदच्या महिन्यामुळे तेलाची मागणी आणखी वाढतच आहे. त्यातच देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाच्या तुटवड्यामुळे किंमतीत वाढ झाली आहे. ज्यामुळे इंडोनेशियन लोकांनी रस्त्यावर उतरून सरकार विरोधात आपला निषेध नोंदवला. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये निर्यातीवर काही निर्बंध लादल्यानंतर साठा पुन्हा भरत आला असला तरी खाद्यतेल ग्राहकांपर्यंत पोहोचण्यात अजूनही अडथळे येत आहेत.