Wednesday, March 29, 2023

मुलगा-मुलगी जन्मासंबंधीच्या वक्तव्यानंतर इंदुरीकर महाराजांचे कोरोनावर मोठं वक्तव्य, म्हणाले…

- Advertisement -

अहमदनगर । दिवाळीनंतर विवाह सोहळे पुन्हा सुरू झाले आहेत. विवाहात मान्यवरांनी वधु-वरांना शुभेच्छापर भाषण करण्याची पद्धत आहे. अशाच एका लग्नात कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर  यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये इंदुरीकरांनी करोनानंतर झालेला बदल टिपताना करोनासंबंधी घ्यायची काळजी आपल्या खास शैलीत सांगून जमलेल्या वऱ्हाडी मंडळींच्या हशा आणि टाळ्याही मिळविल्या आहेत.

इंदुरीकर म्हणतात, आपल्याला लग्न कसे करायचे हे करोनाने शिकविले आहे. थोडक्या मंडळींच्या उपस्थितीत गुपचूप लग्न उरकण्याची वेळ आली आहे. मात्र, या निमित्ताने तुम्हाला एक सांगून ठेवतो, मला करोना होणार नाही, या घमेंडीत कोणी राहू नका. ज्याला झाला त्यांना विचारा, जो बरा झाला त्यालाही विचारा. म्हणजे त्यांचे अनुभव आणि गांभीर्य कळेल. तुम्हाला जर समाजाचे खरेच आपल्यावर किती प्रेम आहे, हे जाणून घ्यायचे असेल तर करोना पॉझिटीव्ह झाल्यावर कळते. त्यामुळे सर्वांनी दक्षता घ्या.

- Advertisement -

अजूनही काही लोक मास्क वापरत नाहीत. हे चुकीचे आहे. पाया पडून सांगतो, मास्क वापरा. करोनाच्या लक्षणांवर लक्ष ठेवा. साधीसाधी लक्षणे आहेत, ते ओळखून काळजी घ्या. पूर्वी एखाद्याला शिंक आली की लोक म्हणत सत्य आहे. आता कोणाला शिंक आली की त्याला दूर करतात. येथून पुढे गर्दी कमी करा. कार्यक्रमाला येणाऱ्यांनी पथ्य पाळले पाहिजे. करोना प्रतिबंधासाठी घालून दिलेले नियम पाळा. तेच सध्या प्रभावी औषध आहे. असेही इंदुरीकर सांगत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’