कराडमध्ये सोशल डिस्टंसिंगसाठी पोलिसांचे अभिनव पाऊल ; कराडकरांना केले ‘हे’ आवाहन

कराड प्रतिनिधी l सकलेन मुलाणी

एकेमकांपासून सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी नागरिकांनी घरातून बाहेर पडल्यानंतर छत्र्यांचा वापर करावा. म्हणून कराड पोलिसांनी सोमवारी रात्री शहरात छाता रँली काढली. केरळच्या धर्तीवर कराड पोलिसांनी टाकलेले पाऊल सोशल डिस्टन्ससाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.

छत्री उघडून एक व्यक्ती उभा राहिला तर त्याच्या आजूबाजूला म्हणजेच किमान एक मीटर अंतरावर कोणीच येऊ शकत नाही. याच माध्यमातून सोशल डिस्टन्सिंग पाळलं जातं. केरळमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असणाऱ्या अलप्पुझा जिल्ह्यातील एका गावामधील नागरिकांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सींगचा अवलंब करण्यासाठी ही भन्नाट कल्पना शोधून काढली. येथील लोकांनी एकेमकांपासून सुरक्षित अंतर ठेवत सोशल डिस्टन्सींगचा अवलंबं करण्यासाठी चक्क छत्र्यांचा वापर सुरु केला आहे.

लोकांनी एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे म्हणून अलप्पुझा जिल्ह्यातील थानीयरमिक्काम गावातील ग्रामपंचायतीने घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने छत्री घेऊन घराबाहेर पडणे बंधनकारक केलं आहे. छत्री डोक्यावर धरुन चालणाऱ्या दोन व्यक्तींमधील किमान अंतर एक मीटरचं असतं. हीच बाब लक्षात घेऊन कराडचे डीवायएसपी सूरज गुरव आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसमवेत सोमवारी रात्री कराड शहरात छाता रँली काढली.

नागरीकांनी छत्री घेऊनच घरातून बाहेर पडावे. दुकानात, भाजी मंडईत जाताना छत्रीचा वापर करून सोशल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन ध्वनीक्षेपकावरून करण्यात आले. सँनिटायझर, मास्कचा वापर प्रत्येकजण करत आहे. त्याप्रमाणे छत्रीचाही वापर केल्यास नागरीक अधिक सुरक्षित होतील, असा विश्वास डीवायएसपी सूरज गुरव आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी व्यक्त केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.