पत्रकारांनाही 50 लाखांचं विमा कवच, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बुलडाणा । कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या कठीण परिस्थितीतही अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपलं कर्तव्य बजावत आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत अत्यावश्यक सेवेत कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना 50 लाखांचा विमा कवच देण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. अत्यावश्यक सेवेत कर्तव्य बजावणाऱ्या व्यक्तींमध्ये पत्रकारांना सुद्धा विमा कवच मिळणार असल्याचे टोपे यांनी सांगितलं. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव पोलिसांसाठी जिल्हा पोलीस विभागाच्यावतीने सुरू होणाऱ्या कोविड केअर सेंटरच्या उदघाटनानंतर टोपेंनी पत्रकारांशी संवाद साधताना ही घोषणा केली.

कोरोनाच्या लढाईत प्रसारमाध्यमे आणि वृत्तपत्रांचाही अत्यावश्यकसेवेत समावेश करण्यात आला आहे. कोरोनाच्या काळाच माहिती मिळवण्यासाठी पत्रकारही मेहनत करतात. आपलं कर्तव्य बजावत असताना काही पत्रकारांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या पत्रकारांना 50 लाखांचं विमा कवच देण्यात येणार असल्याची घोषणा राजेश टोपे यांनी केली.

तरच मिळणार पत्रकारांना विमा कवच
एखाद्या पत्रकाराला कोरोनाची लागण झाली आणि यात दुर्देवाने त्याचा मृत्यू झाला त्याला हे कवच मिळणार आहे. मात्र, सदर व्यक्ती पत्रकार असून कर्तव्य बजावत असताना त्याचा कोरोनाने मृत्यू झाला असं जिल्हाधिकाऱ्यांनी लिहून दिलं तरच विमा कवच मिळेल असं टोपे यांनी स्पष्ट केलं. तसेच कोरोनाचे काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आणि त्याच्यावर हा प्रसंग ओढावला तर जिल्हाधिकाऱ्यांनी लिहून दिल्यावर त्यांनाही 50 लाखांचं हे विमा कवच मिळणार असल्याची घोषणा टोपे यांनी यावेळी केली.

यांनाही मिळणार विमा कवच
कोविडविरुद्धच्या लढ्यात सहभागी असलेले जिल्हा प्रशासन, पोलिस, होमगार्ड, अंगणवाडी कर्मचारी, लेखा व कोषागारे, अन्न व नागरी पुरवठा, पाणी पुरवठा व स्वच्छता, घरोघरी सर्वेक्षणासाठी नेमलेले अन्य विभागाचे कर्मचारी (रोजंदारी, कंत्राटी, बाह्यसेवेद्वारे घेतलेले, मानसेवी असे सर्व कर्मचारी) अशा सर्वंघटकांना 50 लाख रुपयांच्या विमासंरक्षणाचा लाभ मिळणार आहे. ही योजना विमा कंपनीच्या सहकार्यानं राबविण्यात येणार असली तरी यासंदर्भातील पॅकेज अंतिम होईपर्यंत, अंतरिम निर्णय म्हणून राज्य शासनाच्या माध्यमातून हे 50 लाखांचे सानुग्रह अनुदान संबंधीतांना देण्यात येणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment