कोरोनाची साथ नैसर्गिकरित्या संपुष्टात येईल, अनेकांना लसीचीही गरज पडणार नाही; तज्ज्ञांचं भाकीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जगाबरोबर भारतात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक देश यातून बाहेर पडण्यासाठी कोरोनावर लस शोधात असतानाच ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्राध्यापक आणि साथ रोग तज्ज्ञ सुनेत्रा गुप्ता यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण भाकीत वर्तविले आहे. सुनेत्रा गुप्ता यांनी ‘हिंदुस्थान टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, जगातील अनेक लोकांना कोरोनातून बरे होण्यासाठी लसीचीही गरज पडणार नाही. या आजाराचे स्वरुप साध्या तापाप्रमाणे आहे. त्यामुळे ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली आहे आणि ज्यांना इतर कोणत्याही व्याधी नाहीत, त्यांनी कोरोनामुळे चिंतीत होण्याचे कारण नाही.

भविष्यात कोरोनावर लस सापडली तरी त्याचा उपयोग आजाराचा धोका जास्त असलेल्या रुग्णांसाठी होईल. आपल्यापैकी अनेकांना कोरोनाची चिंता करण्याचे कारण नाही. तसेच कोरोनाची साथ ही नैसर्गिकरित्या संपुष्टात येईल. मात्र, भविष्यात कोरोना हा तापाप्रमाणेच आपल्या जीवनाचा एक भाग असेल, असेही सुनेत्रा गुप्ता यांनी सांगितले. यावेळी सुनेत्रा गुप्ता यांनी कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन हा तितकासा प्रभावी उपाय नसल्याचे मतही व्यक्त केले. लॉकडाऊनमुळे थोड्या काळासाठी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता येऊ शकतो. मात्र, दीर्घकालीन विचार करता लॉकडाऊन फायदेशीर ठरणार नाही, असे त्यांनी सांगितले.

तसेच कोरोनाची दुसरी लाट वैगेरे आल्याचा दावाही त्यांनी फेटाळून लावला. जगाच्या अनेक भागात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ही दुसरी लाट नसून ज्या प्रदेशांमध्ये आतापर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव झाला नव्हता, त्याठिकाणी कोरोनाचा पहिल्यांदा शिरकाव झाल्याचे लक्षण आहे. जगातील ज्या देशांमध्ये आतापर्यंत लॉकडाऊन यशस्वीपणे राबवण्यात आला त्याठिकाणी आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत असल्याचे मतही सुनेत्रा गुप्ता यांनी व्यक्त केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment