प्रेरणादायी विचारांचा असामान्य माणूस – लाल बहादूर शास्त्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

व्यक्तिविशेष | लाल बहादूर शास्त्री

लोकांनी स्वातंत्र्याचं स्वप्न पाहिलं होतं, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं. त्या लोकांमधील एक होते लाल बहादूर शास्त्री. अनेक लोक काही कारणास्तव देश स्वतंत्र झाल्याचं पाहू शकले नाहीत. त्यांच्या स्वप्नांसाठी तरी प्रत्येक नागरिकाने स्वातंत्र्याचं मोल जाणून काम करावं ही भावना लाल बहादूर शास्त्री कायम बोलून दाखवायचे. लाल बहादूर शास्त्रींच्या टेबलवर एक वाक्य कायम लिहिलेलं होत. सुंदर फुल उमलतं त्यावेळी त्याचा सुगंध पाहून लोक त्याच्याकडे आकर्षित होतात. आणि ते कोमेजलं की त्याकडे आपोआप दुर्लक्ष होतं. पण त्या फुलाच्या, झाडाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी कोवळी धूप जी असते ती कायम हिरवळच निर्माण करते. माझं आयुष्य हे त्या हिरव्या कोवळ्या धूप (प्रकाशाप्रमाणे) सारखं आहे असा त्या वाक्याचा सोप्या भाषेतील अर्थ होता. सोप्या पण प्रेरणादायी गोष्टी सांगण्यात माहीर असलेल्या लाल बहादूर शास्त्रीचं जीवनच साधेपणावर आधारलेलं होत. ताजमहालाचं उदाहरण देताना ते म्हणायचे, ताजमहाल आज उभा आहे, उद्याही असेल त्याला बघायला येणारे आज भरपूर लोक आहेत, उद्याही असतील. एक काळ असाही येईल की ताजमहाल नष्ट होईल, पण त्याही वेळी लोक ताजमहालाच्या आठवणी मनात ठेवून या ठिकाणी येतील आणि इथली दगडं पाहून म्हणतील, याच दगडांवर ताजमहाल उभा होता. आयुष्यात ढाच्याची उभारणी कधीही करता येईल, त्यासाठी आधी पाया मजबूत करायला हवा. ताजमहाल ज्या दगडावर उभा आहे, त्या दगडासारखं बनायला शिकलं पाहिजे. आपल्याला कुणी किंमत दिली अथवा नाही दिली तरी आपल्याला आपल्या कामावर इतकं लक्ष देता आलं पाहिजे की त्या कामावरच आपल्या आयुष्याचा ढाचा उभा राहिला आहे, आणि तो इतरांना उपयोगी पडतोय याची जाणीव आपल्याला नकळतच होईल.

अजून एका प्रसंगात १९६५ च्या युद्धातील जखमींना भेटण्यासाठी लाल बहादूर शास्त्री दवाखान्यात भेटायला गेले असताना भूपिंदर सिंग नावाच्या भारतीय सैनिकांची एक आठवण डोळ्यांत पाणी आणणारी आहे. जखमी अवस्थेतील भूपिंदर सिंग पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींचा हात हातात घेत म्हणाले, मी आयुष्यात एक स्वप्न बघितलं होतं, आयुष्यात एकदा तरी देशाच्या पंतप्रधानाला भेटावं, त्यांचा हात हातात घ्यावा – ते माझं स्वप्न आज पूर्ण होतंय. पण सैनिक असूनही तुम्हाला मी सॅल्यूट करू शकत नाही याचं दुःखही मला आहेच. माझं काही बरं वाईट झालं तर माझ्या कुटुंबालाही सांगा की माझं स्वप्नं पूर्ण झालं आणि मगच मी प्राण सोडला. स्वप्नांवर विश्वास ठेवून पुढे जाण्यासाठी लाल बहादूर शास्त्री हे भारतीयांना कायमच प्रेरणा देत होते.

जाती-धर्माच्या पलीकडील भारतीयत्व पाहायची वेळ आलीच तर ती देशातील शेतकरी आणि जवानांमध्ये अधिक तळमळीने पाहायला मिळते. देशाच्या सीमेवर लढणारा कोणताच सैनिक त्याच्या जाती-धर्मावरून ओळखला जात नाही तर त्याच्या देशभक्तीवरून ओळखला जातो. असंच देशातील शेतकऱ्यांच्या बाबतीतही म्हणता येतं, कुठलाही विशिष्ट धर्म उच्चारून त्या जातीचे, त्या धर्माचे लोक शेती करतायत असं आपण म्हणत नाही. त्यांची शेतकरी ही एकच जात असते. सामाजिक सलोख्यासाठी देशातील सैनिक आणि शेतकरी सर्वांत महत्त्वाची भूमिका बजावतात म्हणूनच लाल बहादूर शास्त्रींच्या जय जावं, जय किसान या घोषणेकडे आजही मोठ्या प्रेरणेने पाहिलं जातं.

हॅलो महाराष्ट्र परिवारातर्फे लाल बहादूर शास्त्रींना विनम्र अभिवादन..!!

लाल बहादूर शास्त्रीचें चिरंजीव सुनील शास्त्री यांचं हैद्राबादमधील टेड टॉक कार्यक्रमातील भाषण खाली देत आहोत. लाल बहादूर शास्त्रींच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला आहे.

Lal Bahadur Shastri-The Unsung Hero of Indian History | Sunil Shastri | TEDxBITSHyderabad

Leave a Comment