भारताविरुद्ध दंड थोपटणाऱ्या नेपाळच्या पंतप्रधानांना घरातूनच विरोध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

काठमांडू । नेपाळमधील ओली सरकार भारतविरोधी वक्तव्यावरून अडचणीत सापडलं आहे. भारत आपलं सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे, असं वक्तव्य करुन नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली स्वतःच अडचणीत आले आहेत. त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी राजीनाम्याची मागणी केली आहे. भारताविरोधातील ओली यांचे वक्तव्य अत्यंत बेजबाबदार असल्याचं नेपाळमधील नेते म्हणाले.

नेपाळ कम्युनिस्ट पक्षातून पंतप्रधान म्हणून निवडून येणाऱ्या केपी शर्मा ओली यांना त्यांच्याचं पक्षातील नेत्यांनी ओलींना भारताविरुद्धचे आरोप सिद्ध करा, अन्यथा राजीनामा द्या, असा अल्टीमेटम दिला आहे. या नेत्यांमध्ये ३ माजी पंतप्रधानांचाही समावेश आहे. पंतप्रधान ओली यांच्या निवासस्थानी सत्ताधारी पक्षाची एक बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान ओली यांच्या वक्तव्याच्या निषेध करण्यात आला. बंद दाराआड झालेल्या नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या स्थायी समितीच्या बैठकीत पुष्पा कमल दहल प्रचंड, माधव कुमार नेपाळ आणि झलनाथ खनल यांच्यासह माजी उपपंतप्रधान बामदेव गौतम यांनी ओली यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

पुरावा द्या अन्यथा राजीनामा द्या
भारताविरोधात ओली यांचे आरोप अत्यंत चुकीचे आहेत. भारत नव्हे, तर मी स्वतः तुमचा राजीनामा मागत आहे. या बेजबाबदार वक्तव्यासाठी अगोदर पुरावे सादर करा, अशी मागणी पुष्पा कमल यांनी केली. स्थायी समिती सदस्यांच्या मते, खनल, माधव नेपाळ आणि गौतम यांनी ओलींवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आणि मित्र देशाविरोधात चुकीचं आणि बेजबाबदार वक्तव्य केल्याचा आरोप केला. ओली यांनी स्थायी समिती सदस्यांना उत्तरही दिलं आहे. बंद दाराआड झालेल्या बैठकीतील माहिती भारतीय माध्यमांपर्यंत कशी जाते, असा सवाल त्यांनी विचारला. भारत काही नेपाळमधील नेत्यांच्या मदतीने सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय माध्यमातील याविषयीचे वृत्त आणि काठमांडूतील भारतीय दुतावासातील चर्चा यावरुन हे स्पष्ट होतं, असा आरोप ओली यांनी केला.

भारत विरोधी वक्तव्यानंतर स्वपक्षिय ओलींना विरोध
ओली यांच्या भारत विरोधी वक्तव्यानंतर आता स्वपक्षिय नेतेच आक्रमक झाले आहेत. स्थायी समितीचे सदस्य गौतम हे बैठकीत सर्वात आक्रमक झाल्याची माहिती आहे. पक्ष अध्यक्ष आणि पंतप्रधान या दोन्ही पदांचा राजीनामा ओली यांनी द्यावा, असं ते म्हणाले. पक्षाबाहेरुनही ओलींवर टीका होत आहे. भारताविरोधात केलेल्या आरोपांवर ओली यांनी तातडीने पुरावे सादर करावेत, अशी मागणी नेपाळचे माजी पंतप्रधान बाबुराम भट्टाराय यांनी केली. भारतीय दुतावास सरकार पाडण्याचं नियोजन करत आहे, तर मग तुम्ही राजदुताला काढून का टाकत नाही, असा सवालही त्यांनी केला. नेपाळमधील एका पक्षाचे सहअध्यक्ष डॉ. प्रकाश चंद्र लोहानी यांनीही ओलींवर निशाणा साधला. ओलींना बाहेर काढण्यासाठी कुणाचीही गरज नाही. त्यांना स्वतःच बाहेर पडण्याची घाई झाली आहे, असं ते म्हणाले.

Leave a Comment