कोरोनाचा कहर: जगभरातील आरोग्य व्यवस्थेबाबत WHOला वाटतेय ‘ही’ भीती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जिनिव्हा । कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे अनेक देशांच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पडला आहे. जगभरातील जवळपास ९० टक्क्यांहून अधिक देशांमधील आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) व्यक्त केली आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे इतर आजारांच्या रुग्णांच्या वैद्यकीय तपासणी, आरोग्य कार्यक्रम, लशीकरणावर परिणाम होत आहे. WHOने मार्च ते जून या दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे जगभरातील कोरोनाची सद्यपरिस्थिती कायम राहिल्यास आरोग्य यंत्रणा उद्धवस्त होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे अनेक नियमित आरोग्य तपासणी, आरोग्यविषयक असलेल्या तक्रारींचे निदान लांबणीवर पडले आहे.

कोरोनाच्या महासाथीमुळे कर्करोगाच्या उपचारावर मोठा परिणाम झाला आहे. मध्यम आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांना सर्वाधिक अडचणींना सामना करावा लागू शकतो. निम्म्याहून अधिक देशांमध्ये गर्भनिरोध आणि कुटुंब नियोजन (६८ टक्के) मानसिक आरोग्याशी संबंधित असलेला उपचार (६१ टक्के) आणि कर्करोगाबाबतच्या उपचारांवर (५५ टक्के) परिणाम झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, जगभरात करोनाबाधितांची संख्या २ कोटी ५३ लाखांच्या घरात आहे. तर, ८ लाख ४७ हजारजणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत कोरोनाच्या संसर्गामुळे परिस्थिती चिंताजनक झाली आहे. करोनावरील लशींवर अवलंबून न राहता नागरिकांनी सजग राहण्याचे आवाहन केले आहे. युरोपमधील अनेक ठिकाणी शाळा पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

लशीबाबत घाई महागात पडू शकते
कोरोनाला अटकाव करणाऱ्या लशींना मंजुरी देण्याबाबतच्या प्रक्रियेला अधिक गंभीरपणाने घेण्याची आवश्यकता असल्याचे WHOने म्हटले आहे. WHOच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी पत्रकारांना सांगितले की, सर्व देशांना लस चाचणी पूर्ण होण्याआधी मंजुरी देण्याचा अधिकार आहे. मात्र, अशा औषधांना, लशींना अगदी सहजपणे घेण्यासारख्या गोष्टी नाहीत. सध्या जगात ३३ लशींची क्लिनिकल चाचणी सुरू आहे. तर, १४३ लशी या प्री क्लिनिकल इव्हॅल्यूशनच्या टप्प्यात आहेत. जे देश लस चाचणीचे टप्पे पूर्ण न करता लशींना मंजुरी देत आहेत, त्यांना वाईट परिणामांनाही सामोरे जावे लागण्याची भीती असल्याचेही त्यांनी सांगितले. रशिया आणि चीन या दोन्ही देशांनी आपल्या लशींना परवानगी दिली आहे. आता या दोन देशांनंतर अमेरिकाही लशीला परवानगी देणार आहे. अमेरिकेचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे प्रमुक स्टीफन हॉन यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment