Monday, January 30, 2023

मोगराळेच्या घाटात प्रवास करताना मृत्यूला आमंत्रण

- Advertisement -

दहिवडी प्रतिनिधी | आकाश दडस

दहिवडी- फलटण मार्गावरील मोगराळेच्या घाटात अनेक धोकादायक वळणावर दिशादर्शक फलकांचा अभाव, जीर्ण लोखंडी कठडे, अर्धवट तुटलेली भिंत अशी दुरावस्था पाहावयास मिळते. या स्थितीमुळे वाहनाद्वारे घाटातील प्रवास भरोसे होत असल्याची भाविकांची भावना आहे.

- Advertisement -

पावसाळ्यात अनेक ठिकाणी रस्त्याला ठिकठिकाणी मोठे भगदाड पडत असल्याचा अनुभव आहे. रस्त्याच्या दुरूस्तीसाठी व रस्ता खचू नये यासाठी भराव तसेच संरक्षक भिंत बांधण्यासाठी दरवर्षी लाखों रूपयांची कामे संबंधित विभागामार्फत केली जातात. मात्र दरवर्षी पहिल्याच पावसात घाटातील रस्ता नेहमी प्रमाणे खचत असल्याने कामाची गुणवत्ता व उपयोगिता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

नागमोडी वळणे, खोल दरी, अरूंद रस्ता यामुळे घाटात वाहन चालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातच रस्त्यावर दरळी कोसळलेल्या दरळी, तीव्र चढाव व उतार, खचलेला रस्ता, रस्तावर माती व चिखल, संरक्षक कठड्यांचा अभाव व दुरावस्था यामुळे घाटातील वाट अधिक बिकट बनली आहे. या सर्व प्रकारामुळे वाहनधारकांना व प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असतो. तारेवरची कसरत करीत वाहनधारकांना घटमार्गात वाहने मार्गस्थ करावी लागत असतात.घाट मार्गात अनेक अत्यावश्यक ठिकाणी रस्त्याच्या कडेला संरक्षण काठड्यांचा अभाव असल्याचे दिसून येते. घाटात अनेक ठिकणी संरक्षक कठड्यांची अत्यावश्यक गरज असून, त्याकडे नेहमी दुर्लक्ष करण्यात आले आहे.

बांधकाम विभागाला जाग कधी येणार ?

या भागातील लोकप्रतिनिधी व बांधकाम विभागाचे प्रशासन आपल्या कार्यालयात बसूनच काम करत असतात त्यामुळे याकडे लक्ष द्यायला वेळ नसल्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे. संरक्षक भिंत, गांजलेल्या अवस्थेतील लोखंडी कठडे, धोकादायक वळणावर दिशा दर्शक फलकांचा अभाव या त्रुटी दुर्घटनेस कारणीभूत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.