Thursday, February 2, 2023

IPL 2021: टी. नटराजनला कोरोना असूनही दिल्ली-हैदराबाद सामना खेळला जाणार, BCCI चा मोठा निर्णय

- Advertisement -

नवी दिल्ली । कोरोनाने पुन्हा एकदा इंडियन प्रीमियर लीग 2021 (IPL 2021) मध्ये धडक दिली आहे. सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज टी नटराजन कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. नटराजन कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना धोक्यात आला होता, परंतु BCCI ने यावर आपला निर्णय दिला आहे. BCCI ने स्पष्ट केले आहे की, दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना वेळापत्रकानुसार होणार आहे. दिल्ली आणि हैदराबाद यांच्यातील सामना बुधवारी संध्याकाळी 7.30 वाजता दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. टी नटराजनला संघातून वगळण्यात आले असले तरी ऑलराउंडर विजय शंकरही नटराजनच्या जवळच्या संपर्कात असल्याने त्याला आयसोलेट केले गेले आहे.

सनरायझर्स हैदराबाद संघातील नटराजन आणि सपोर्ट स्टाफसह एकूण 7 लोकांना आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आले आहे. यामध्ये ऑलराउंडर विजय शंकर, टीम मॅनेजर विजय कुमार, फिजिओ श्याम सुंदर, डॉ अंजना, लॉजिस्टिक मॅनेजर तुषार खेडकर आणि नेट बॉलर पी गणेशन यांचा समावेश आहे. BCCI ने माहिती दिली की, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना ठरलेल्या वेळापत्रकानुसारच सुरू होईल. हैदराबादच्या खेळाडूंची RT-PCR टेस्ट सकाळी 5 वाजता करण्यात आली ज्यामध्ये संपूर्ण टीम निगेटिव्ह आली.

- Advertisement -

अनलकी नटराजन !
टी नटराजन सध्या अनेक अडचणींना तोंड देत आहे. दुखापतीमुळे नटराजन गेल्या पाच महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानात उतरू शकलेला नाही. नटराजनला टी -20 विश्वचषक संघातही स्थान मिळाले नाही. आता तो आयपीएलमधून परतणार होता मात्र आता तो कोरोनाच्या पकडीत आहे. टी नटराजन कोविड पॉझिटिव्ह आला असला तरी त्याला कोणताही त्रास होत नाही आहे. वास्तविक, कोरोनाची लक्षणे नटराजनमध्ये दिसत नाहीत. जर आपण सामन्याबद्दल बोललो तर दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे त्यांनी 6 सामने जिंकले आहेत.तर दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबाद 7 सामन्यांमध्ये फक्त एका विजयासह शेवटच्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत, आता सनरायझर्ससाठी प्रत्येक सामना करा किंवा मरा सारखा आहे.