इस प्यार को मैं क्या ‘नाम’ दूँ – प्रेमाच्या दुनियेची रंजक सफर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

प्रेमावर बोलू काही | डॉ. सचिन लांडगे

Sternberg’s Theory नुसार तीन प्रकारच्या भावना आणि त्यांचा कमीअधिकपणा यावर सगळ्या प्रकारच्या प्रेमांचा महाल उभा असतो..
१. एक म्हणजे Intimacy (दाट सख्य/जवळीक).. याची सुरुवात Liking (आवड) नी होते..
२. दुसरी भावना म्हणजे Passion (उत्कटता).. याची सुरुवात Infatuation (आकर्षण/मोह) नी होते.. याला आपण प्रेमवेड म्हणू शकतो..
३. आणि तिसरी भावना म्हणजे Commitment (वचनबद्धता).. ही वचनबद्धता म्हणजे केवळ लग्न किंवा Engagement नव्हे.. तर वचनबद्धता म्हणजे एकमेकांत कुठलंही नातं सुरू करण्यासाठी त्याच्या अलिखित नियम व अटींसाठी दर्शविलेली (मूक अथवा उघड) सहमती, एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं दिलेलं आश्वासन.. (या अपेक्षा वेगवेगळ्या नात्यांत वेगवेगळ्या असतात).. आणि एकमेकांची घेतलेली जबाबदारी..

यानुसार प्रेमाचे सात प्रकार होतात –

१. Liking only.
२. Infatuation only. (Love at first sight)..
३. Commitment only. (Empty Love)
४. Liking + Commitment = Companionate Love (सोबती प्रेम)
५. Infatuation + Commitment = Fatuous Love (प्रेमळ प्रेम).
६. Intimacy + Passion = Romantic Love (प्रणयरम्य प्रेम)
७. Intimacy + Passion + Commitment = Consummate Love (परिपूर्ण प्रेम)


आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक नात्यातलं प्रेम , मग ते मित्रामित्रातलं असो, कुटुंब नात्यातलं असो, किंवा मग गर्लफ्रेंड-बॉयफ्रेण्ड, नवरा-बायको, आणि मित्रमैत्रिण, अशा कोणत्याही नात्यातलं प्रेम हे नक्की कोणकोणत्या प्रकारात येतं ते आपण बघू..


Liking only –

या प्रकारात साधारणतः सर्व प्रकारची ‘मैत्री’ येते. मित्रा-मित्रातली किंवा मित्र-मैत्रिणी मधली निखळ मैत्री या सदरात मोडते..
[जेव्हा ती मैत्री दाट होऊ लागते तेंव्हा त्यात commitment (अपेक्षा, आश्वासकता आणि जबाबदारी) येते. मैत्री आणि दाट मैत्री यात फरक कमिटमेंट्सचा असतो.. अशा नात्याला Companionate Love (म्हणजेच, सोबती प्रेम) म्हणतात. ते आपण पुढे पाहू..]

या Intimacy (जवळीक) ची सुरुवात Liking ने होते.. जवळीक ही फक्त शारीरिकच असते असं नाही.. Intimacy ही साधारणतः चार प्रकारची असते.. Emotional (भावनिक), Psychological (मानसिक), Spiritual (आत्मिक), आणि Physical (शारीरिक).. [यातली शारीरिक जवळीक ही ‘प्रेम/सेक्स’ या अर्थाने न घेता, प्रत्यक्ष एकमेकांसोबत असणे किंवा सलगी/सहवास या अर्थाने घ्यावी..]


Commitment only –

  • कुटुंबातील बरीच नाती अशी असतात. भावाभावात किंवा भाऊबहिणीत किंवा कोणत्याही कौटुंबिक नात्यात फक्त जबाबदारी शिल्लक असते पण एकमेकांबद्दल काहीच attachment जवळीक जिव्हाळा नसतो, आपण केवळ करायचं म्हणून करत असतो.. ती नाती Commitment only या प्रकारात येतात..
  • लग्न (विशेषतः अरेंज मॅरेज) केलेल्या बऱ्याच जोडप्यात फक्त कमिटमेंट (तीही जुजबी) असते. त्यातल्या एकाला किंवा कधीकधी दोघांनाही एकमेकांशी मानसिक/भावनिक जवळीकही नसते आणि लैंगिक आवडही नसते.. केवळ गरजेपुरता शरीरधर्म पाळला जातो.. फक्त नातं निभावणं सुरू असतं. याला Empty Love असंही म्हणतात..

अरेंज मॅरेजच नव्हे तर कोणतंही नातं जवळीक आणि उत्कटतेअभावी Empty love होतं..


Companionate Love –

हे असं प्रेम आहे, ज्या प्रेमात Intimacy (दाट सख्य/जवळीक) आणि commitment (वचनबद्धता) असते. याला सोबती प्रेम देखील म्हणतात.

  • म्हातारपणी जोडप्यात असं प्रेम दिसतं.. यात शारीरिक उत्कटता संपलेली असते, पण दाट जवळीक, शेअरिंग, केअरिंग, आणि जबाबदारी असते..
  • कुटुंबातील एकमेकांबद्दल ओढ आपुलकी असणारी सगळी नाती यात येतात.
  • मित्रा-मित्रातली दाट मैत्री यात येते.. – मित्र-मैत्रिणी मध्ये असलेल्या या प्रकारच्या दाट मैत्रीला प्लेटोनिक लव्ह म्हणतात.

प्लेटोनिक लव्ह – यात Passion (लैंगिक उत्कटता) अजिबात नसते. Sexual goals नसतात, किंवा त्याला प्राथमिकता तरी नसते.. त्या दोघांत मानसिक बंध (meaningful conversations, sharing of values, and interests) असतात, भावनिक शेअरिंग असतं (Affirming, caring, and interested in each others feelings), आणि आत्मिक बंध (respect for each others beliefs, shared purposes, and nurtures each others inner peace) ही असतात..

‘एक लड़का और एक लड़की कभी एक दूसरे के दोस्त नहीं हो सकते’ असं परंपरांतून किंवा चित्रपटातून मनावर बिंबवलं गेलेल्या पिढ्यांना हे अजब वाटेल, पण हे असं असू शकतं..

भलेही हे दोघे प्रत्यक्षात एकमेकांसोबत असोत, वा कधी त्यांनी एकमेकांना प्रत्यक्षात पाहिलेलंही नसो.. त्यांच्यात छान मैत्रीपासून सुरुवात होते.. मन, विचार, भावना जुळल्याने आणि एकमेकांकडून वैचारिक स्पेस आणि आदर मिळाल्याने त्यांची मैत्री अधिकच दृढ होत जाते.. मग त्यांचे संबंध मैत्रीच्या पल्याड जातात.. मैत्रीच्या पल्याड पण लैंगिकतेच्या आल्याड असं ते नातं असतं..

पूर्वी मुलगा मुलगीचं एकमेकांशी बोलणं हे गैर अर्थानंच घेतलं जायचं, पण आजच्या युवा पिढीने त्या भिन्न नात्यातली लैंगिकता ‘स्विकारली’ आहे, आणि त्याला बायपास करून (वळसा घालून) ते त्याच्या पुढं जाऊ शकताहेत.. म्हणजे ते त्यातली ‘सहजता’ही स्वीकारायला शिकत आहे.. त्याचे अवडंबर न माजवता ती स्वीकारणे ही काळाची गरज आहे.. ते वैचारिक परिपक्वतेचे ते लक्षण आहे. याचा एकत्रित परीणाम म्हणून ते सख्ख्या मैत्रिणीला “You are looking hot today” असे कोणताही लैंगिक अभिनिवेष न दाखवता ‘सहजपणे’ म्हणू शकतात. आणि मैत्रीणही त्या वाक्यामुळे offended न होता, ते वाक्य ‘as a compliment’ म्हणून स्विकारू शकते.. याचं कारण, ‘तिने Hot दिसण्याचा प्रयत्न करणे’ ही आदिम भावना त्यांनी समजावून घेतली आहे..
म्हणूनच, लैंगिकतेचा पूर्वीसारखा ‘नको इतका ताण’ आज नवीन पिढीला जाणवत नाही, म्हणून अशांच्यात असं प्लेटोनिक प्रेम निर्माण होऊ शकतं..

मग तुम्ही विचाराल, अशा नात्यात ‘लैंगिक उत्कटता’ (Passion) निर्माण होऊ शकते का? किंवा हे प्लेटोनिक प्रेम ‘रोमँटिक प्रेमात’ बदलू शकते का?
तर याचं उत्तर आहे- हो, बदलू शकते!
त्यातल्या एकाला किंवा दोघांना कुठल्याही टप्प्यावर असं वाटू शकतं.. जोवर हे वाटणं मनातल्या मनात आहे तोवर ते प्लेटोनिक नात्याच्या आड येत नाही, पण वागण्याबोलण्यातून लैंगिक उत्कटता डोकावू लागली तर मात्र समोरच्याला ते तिथून पुढं निभावणं अवघड होऊन बसतं.. मग ते नातं किंवा त्यांच्यातलं प्रेम हे प्लेटोनिक राहत नाही.. एकतर (आजूबाजूची परिस्थिती पूरक असेल तर) ते Romantic किंवा Consumate love होण्याकडं वाटचाल होते, अन्यथा ते तिथेच संपते..


Fatuous Love – म्हणजे प्रेमळ प्रेम.

  • साधारणतः courtship मध्ये (म्हणजे लग्न ठरल्यापासून ते होण्यापर्यंतच्या काळात) असं प्रेम असतं.. यात commitment दिलेली असते, एकमेकांबद्दल शारीरिक आकर्षणही असतं, तीव्र ओढ असते, पण मानसिक/भावनिक जवळीक (अजून तितकीशी) झालेली नसू शकते.. अरेंज मॅरेज मध्ये लग्नासाठी दिलेल्या होकाराचा अर्थ ‘ती व्यक्ती आवडलेली आहे’ असं नसू शकतं ना! एकमेकांना अजून इतकं समजून घेतलेलं नसतं. या काळात काहीजण खरंच प्रेमात पडून रोमँटिक लव्ह मध्ये enter होतात.. असो..
  • बरीच जोडपी लग्नानंतर याच पातळीवर राहतात/येतात.. एकमेकांच्या मनात घर करणं त्यांना (किंवा त्यातल्या एकाला) जमत नाही.. त्यांच्या फारसं भावनिक शेअरिंग नसतं, मनापासूनचं केअरिंग नसतं, आत्मिक बंध नसतात (एकमेकांच्या सहवासातून आत्मिक शांती/ Inner peace मिळत नाही), त्यांच्यात चांगली मैत्री देखील नसते, पण त्यांच्यात एकमेकांबद्दलची शारीरिक ओढ मात्र टिकून असते आणि एकमेकांप्रति commitmentही असते..

जर कालांतराने त्यांच्यातलं infatuation (एकमेकांबद्दलची शारीरिक आसक्ती) संपलं तर नातं टिकवायची धडपड (Commitment only) सुरू होते.. Fatuous Love मधले Passion संपलेले हे commitment only संसार मग समाजासाठी आणि मुलाबाळांसाठी सुरू राहतात..


Infatuation only –

यात फक्त मोह किंवा शारीरिक आकर्षण असतं. Love at first sight हा यातलाच प्रकार.. Infatuation मधून सुरुवात होणं ठीक आहे, पण ते त्याच्या पुढं गेलं पाहिजे.. Infatuation जर दोघांनाही असेल तर त्यांना ‘Friends with benefit’ म्हणतात. यांच्यात मैत्री असू शकते, पण भावनिक गुंतवणूक नसते.. आणि हे Infatuation/आकर्षण एकालाच असेल तर त्याला ‘एकतर्फी प्रेम’ म्हणू शकतो आपण..

एकतर्फी प्रेम म्हणजे काय?
बरेच जण म्हणतात की, ‘एकतर्फी प्रेम’ हे ‘प्रेम’च नसतं.. पण असं नाहीये..
याचे तीन sub sets आहेत..

  • या पहिल्या प्रकारात फक्त एकालाच Infatuation /मोह असतो.. म्हणजे, एकाला तीव्र आकर्षण आहे आणि दुसऱ्याला ते अजिबातच मान्य नाही, असा प्रकार हा ‘प्रेम’ कसा असेल, हा प्रश्न आपल्या मनात येणं साहजिकच आहे.. पण Infatuation(मोह) ही प्रेमाचीच भावना आहे.. ती जोपर्यंत दुसऱ्याला निरुपद्रवी आहे, तोपर्यंत तरी ती प्रेम म्हणून ठीक आहे, पण जेव्हा त्रास देणं सुरू होतं तेंव्हा ते ‘प्रेम’ उरत नाही.. कारण त्रास/सूड/बदला या प्रेमाच्या भावना नाहीयेत.. Everything is fare in Love and War.. असं म्हणलं जातं.. but, everything is NOT fare in Love!!
  • दुसऱ्या प्रकारात एकमेकांची ‘फक्त ओळख’ ते ‘दाटमैत्री’ या स्केलवर काहीतरी असते, पण यातला एकच जण प्रेमाच्या पातळीवर गेलेला असतो (म्हणजे त्याच्या बाबतीत त्यात Passion/उत्कटता add झालेली असते).. [Commitment ची तयारी असणे/नसणे हा भाग नंतरचा!]
  • तिसरा प्रकार म्हणजे, स्वप्नरंजन प्रेम.
    यात आवड/मोह हा भाग खरा असतो, पण बाकीचं Imaginary असतं..

कित्येक मुली हिरोंवर आणि मुलं हिरोईन वर हे ‘स्वप्नरंजन प्रेम’ करत असतात.. मनातल्या मनात मांडे खात असतात, त्यांच्या पिक्चरमधल्या भूमिकांवर भाळलेले असतात, आणि त्यावरून प्रत्यक्षातल्या अपेक्षा ठेवत असतात.. बरेचसे जण आणि काही जणी त्यांच्या सोबत शारीरिक जवळीकीचे स्वप्नरंजन देखील करत असतात. त्यांच्यावरील टीका किंवा त्यांच्या निगेटिव्ह भूमिका यांना सहन होत नाहीत. असो..
हे झालं हिरो-हिरोईन बद्दल.. बुद्धिमान व्यक्तींबद्दल असं वाटतं तेंव्हा त्याला Sapiosexual Love म्हणतात..

का होतं हे मनातल्या मनात एकतर्फी प्रेम किंवा स्वप्नरंजन?
समजा, एखादा मुलगा/मुलगी खूप आवडतीये पण एकमेकांत असलेल्या परिस्थितीच्या वेगळेपणामुळे म्हणा, किंवा आर्थिक/सामाजिक स्टेटसमुळे म्हणा, (अथवा जातधर्म वेगळे असल्याने म्हणा) त्या व्यक्तीला आपण कधीच मिळवू शकणार नाही याची जाणीव असते, मग अशा वेळी माणूस त्या व्यक्तीवर पहिल्यापासूनच एकतर्फी प्रेम किंवा स्वप्नरंजन करू लागतो.. कधीकधी समोरची व्यक्ती ‘मॅरीड’ असते, त्यामुळं ती व्यक्ती ‘आऊट ऑफ रिच’ असल्याने, कित्येक जण/जणी त्या आपल्याला आवडलेल्या व्यक्तीवर असं स्वप्नरंजन प्रेम करत असतात.. तिला/त्याला आपलं हे प्रेम कळलं तर होणारी भावनिक गुंतागुंत कुठलंही अप्रिय वळण घेऊ शकते याची सजग जाणीव असते, अशा वेळी मनातल्या मनात हे अव्यक्त प्रेम जोपासलं जातं.. त्याच्याशी/तिच्याशी मनातल्या मनात ‘समांतर संसार’ केला जातो, शारीरिक स्वप्नरंजनही होतं!

यात आपण आपल्या जोडीदाराशी प्रतारणा (Infidelity) करतोय असं म्हणता येणार नाही कारण- जोडीदाराशी ‘सर्व पातळींवरची एकनिष्ठा’ हा प्रकारच वागायला अशक्य आहे! लग्नबंधनात मानसिक भावनिक आणि शारीरिक एकनिष्ठा अपेक्षिलेल्या असतात. पण केवळ शारीरिक बाह्यसंबंधांनाच ‘प्रतारणा’ समजलं जातं.. कारण मानसिक किंवा भावनिक बाह्यसंबंध बघता किंवा मोजता येत नाहीत! कितीतरी मॅरीड मुलींना मनातून शाहरुख सोबत (किंवा इतर कोणासोबतही) सेक्स करावा वाटत असला तरी, त्यांनी actual सेक्स केल्याशिवाय त्याला आपण ‘प्रतारणा’ या सदरात टाकत नाही! पुरुषांबाबतही तेच.. असो..

म्हणून पूर्वीची आवडत असलेली कॉलेजमैत्रीण, किंवा मित्राची बायको, मैत्रिणीचा नवरा, किंवा ऑफिसमधील कलीग, (यांना रोज रोज पाहून किंवा यांच्याबद्दल चांगलं चांगलं ऐकून) अशा एखादया अप्राप्य मॅरीड मुलीशी/मुलाशी “स्वप्नरंजन प्रेम” करणं , मनातल्या मनात तिच्याशी पॅरेलल संसार करणं, हा प्रेमविश्वातला बराचसा भाग व्यापून आहे..

म्हणजे हा सगळा प्रथमतः Infatuation चा भाग असतो, आणि त्या जोरावर आपण आपल्या कल्पनेतच त्या व्यक्तीशी मानसिक जवळीक केलेली असते.. हा एकतर्फी प्रेमाचा वरवर निरुपद्रवी वाटणारा प्रकार आहे.. पण यातून आपण आपल्या खऱ्या आयुष्यात अवाजवी अपेक्षांच्या कल्पना करत असू वा संसारात त्याचं frustration काढत असू तर ते चूक आहे..


Romantic love & Consummate Love –

रोमँटिक प्रेमात एकमेकांची गुंतवणूक (Intimacy) असते आणि एकमेकांच्यात लैंगिक आकर्षणही (Passion) असते.. प्रियकर प्रेयसी यांच्यातलं प्रेम हे या प्रकारातलं असतं.. [दोघांत काहीच गुंतवणूक नसेल तर अशा दुतर्फा Infatuationला ‘Freinds with benefit’ म्हणतात, हे आपण आधीच पाहिलेय]..

आता या Romantic Love मधल्या कमिटमेंट बद्दल पाहू..
या रोमँटिक प्रेमात जेंव्हा मनापासून कमिटमेंट दिली/घेतली जाते, तेंव्हा ते consummate Love बनतं..

पहिली गोष्ट, कमिटमेंट म्हणजेच लग्न असं नव्हे.. दुसरी गोष्ट, रोमँटिक प्रेम अविवाहित लोकच करतात असं नव्हे, आणि तिसरं म्हणजे, रोमँटिक प्रेम ही तरुणांचीच मक्तेदारी आहे, असं नव्हे..
आणि मुख्य म्हणजे प्रेम हे आयुष्यात एकदाच होतं असं अजिबात नव्हे..

आपण Intimacy च्या चार पातळ्या बघितलेत.. यातल्या Physical आणि Psychological (Mental) पातळीपर्यंत कमिटमेंट्स येत नाहीत, पण भावनिक आणि आत्मिक Intimacy निर्माण झाली, तर कमिटमेंट्स आपोआप येतात.. आणि ते प्रेम Consummate Love (परिपूर्ण प्रेम) होण्याकडं वाटचाल सुरू होते.. (पुन्हा सांगतो, commitment म्हणजे लग्न नव्हे!, किंबहुना लग्न हा प्रेमाच्या सफलतेचा क्रायटेरियाच नाही..) कारण, प्रेम हे मानवाच्या उत्पत्तीपासून आहे. ते लाखो वर्षांपासून आहे.. अन विवाहसंस्था येऊन फक्त चार पाच हजार वर्षे झाली असतील.. म्हणून प्रेमाचा अन लग्नाचा काहीएक संबंध नाही.. म्हणजे, लग्न ही प्रेमातली commitment नसून, लग्न हा ती कमिटमेंट long term करण्याचा एक मार्ग आहे..

आपलं प्रेम असलेल्या व्यक्तीशी ‘लग्न’ करून आपण नक्कीच आपल्या प्रेमाप्रतिची आपली commitment ही long term करण्यास मदत करतो, पण ती मनातून देखील तशीच राहिली पाहिजे, तरच त्याला अर्थ आहे.. कारण कमिटमेंट ही मनातून द्यायची असते.. म्हणून ‘लग्न’ हे प्रेमाच्या सफलतेचा निकष नाही ठरू शकत.. आणि दुसरी गोष्ट, कमिटमेंट लॉंग टर्म करण्याचा लग्न हा सध्याच्या परिस्थितीतला आणि समाजमान्य मार्ग जरी असला तरी कुठल्या इतर कारणांनी तो मार्ग अवलंबिता नाही आला, तर ते चूक नाही.. कारण प्रेम झालंय म्हणून लग्न व्हावंच हे गृहीतकच चूक आहे, आणि लग्न होऊ शकणार नाही म्हणून प्रेम नाकारणंही चूक आहे.. आपलं त्याला आपले समाजनीतीचे नियम लावणेच चूक आहे.. ह्या साच्यात बसलं तरंच तुमचं खरं प्रेम! आणि लग्न केलं तरंच तुम्ही खरे प्रेमी! असं काही नसतं..

अशी कल्पना करून पहा, की आपल्या आजूबाजूला विवाह नावाचा प्रकारच अस्तित्वात नसता तर प्रेमाधारावरच नाती बनली, मॅच्युअर झाली अन टिकली असती.. तेच आता ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मधून समोर येतंय.. असो..


एक प्रेम हे दुसऱ्या प्रेमात बदलूही शकते, आणि काळाच्या ओघात कमीजास्तही होऊ शकते.. उदाहरणातून हे समजून घ्यायचे असेल तर-
१. समजा तुम्हाला ऑफिस मधली कलीग खूप आवडतीये, आणि तुमचं तिच्यावर प्रेम जडलं तर ते Infatuation आहे..
२. समजा ती तुम्हाला दिसण्याबाबत ठीक आहे पण त्याहीपेक्षा जास्त ती तुम्हाला स्वभावाने आणि मनाने आवडलीये, (Liking only).. तुमच्यात मैत्री झालीये (Intimacy).. तुमची खूप छान मैत्री आणि भावनिक जवळीक आहे, पण दोघांच्या मनात शारीरिक उत्कटता नाहीये, तर ते झालं Companionate Love (सोबती प्रेम).. तुमच्यात भावनिक जवळीकीसोबतच तुमच्यात वैचारिक आणि आत्मिक बंध पण निर्माण झालेत, तर ते आहे प्लेटोनिक लव्ह..
३. समजा यात तुम्हाला एकट्याला शारीरिक आकर्षण पण निर्माण झालं, तर ते आहे स्वप्नरंजन प्रेम.. किंवा ती मॅरीड आहे, आणि तिची अन तुमची चांगली मैत्री आहे, पण तुम्हाला एकट्यालाच तिचं शारीरिक आकर्षण पण आहे, तर ते झालं स्वप्नरंजन प्रेम..
हे सगळं एकतर्फी प्रेमच असतं..
४. समजा तुमची ऑफिस मधली कलीग आहे, ती तुम्हाला आवडतीये, तिच्याशी तुमची मैत्री आहे, अन एकमेकांबद्दल दोघांना प्रेम भावना उत्पन्न झाल्या (मग त्यातला एक किंवा दोघेही मॅरीड असोत नसोत) तर ते आहे रोमँटिक प्रेम.. हे रोमँटिक प्रेम केवळ भावनेच्या पातळीवर न राहता, यात जर एकमेकांना कमिटमेंटची संधी मिळाली तर ते Consummate Love (परिपूर्ण प्रेम) होतं.. लग्नातून केवळ ती कमिटमेंट लॉंग टर्म आणि समाजमान्य होते.. पण लग्न होऊ शकलं नाही तर हे Consummate Love दोघांच्या मनोविश्वात भावनिक पातळीवर राहते (जोपर्यंत काळ आणि प्रायोरीटीज त्याला पुसट करत नाहीत)..
५. या रोमँटिक किंवा consummate प्रेमात त्यांचं लग्न होऊ शकलं नाही, तर त्यातला एक (किंवा दोघंही) जण काळाच्या ओघात फक्त मैत्री कडं जाऊ शकतो/शकतात, आणि पुढं आपल्या जोडीदाराशी किंवा इतर कोणाशी कदाचित प्रेमात देखील पडू शकतात..
६. किंवा रोमँटिक प्रेमात त्यांना कमिटमेंट ची संधी नाही मिळाली आणि पुढं वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची लग्ने झाली तर त्यातला एक (किंवा दोघेही) काळाच्या ओघात पुढं आपल्या जोडीदाराशी किंवा इतर कोणाशी प्रेमात देखील पडू शकतो/शकतात, आणि पूर्वीच्या प्रेमात फक्त शारीरिक आकर्षणापुरतं राहू शकतो/शकतात..
७. समजा, या दोघांचं लग्न झालं, पण पुढं त्यांच्यात भावनिक दुरावा आला, तर ते प्रेम केवळ Fatuous love राहू शकतं, आणि भावनिक दुराव्यासोबतच त्यांच्यात शारीरिक आकर्षणही नसेल तर ते Empty Love ही होऊ शकतं..

आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर आणि कोणत्याही वयात रोमँटिक लव्ह होऊ शकतं.. आपण प्रेम करतो, जीवापाड जपतो.. पण कधी परिस्थिती किंवा प्रायोरीटी आडवी येते, आपण कमिटमेंट लॉंग टर्म पाळू शकत नाही.. मग आपण प्रॅक्टिकली ‘मूव्ह ऑन’ होतो, संसारात रमतो, परत प्रेमातही पडतो.. पण म्हणून आपण चुकीचे ठरत नाही की आपली आधीची प्रेमं चुकीची ठरत नाहीत.. ज्या त्या वेळेसच्या आपल्या भावना सच्च्या असतात.. आठवणीतलं प्रेम आणि प्रेमाच्या आठवणी आपल्या भावनांचा डोह कधीही ढवळून काढू शकतात.. आणि हीच प्रेमाची ताकद आहे..


भिन्नलिंगी व्यक्तींच्या प्रेमाची सुरुवात नुसत्या मैत्रीतून होवो, Infatuation नी होवो, प्लेटोनिक प्रेमातून होवो, वा रोमॅण्टिक प्रेमातून होवो.. कुठल्याही परिस्थितीत प्रेमात “Intimacy” खूप जास्त महत्वाची असते.. एकमेकांची मनं जुळणं, एकमेकांचा सहवास, त्यांच्यात इमोशनल शेअरिंग असणं आणि त्यातून एकमेकांना आत्मिक समाधान मिळणं हा भाग प्रेमासाठी त्यामुळंच खूप महत्त्वाचा मानला गेलाय..

पण आपल्याकडे लग्नं ही मनं जुळलीत म्हणून करतच नाहीत.. ती बऱ्याचदा तडजोडच असते. संततीसंवर्धन आणि तहहयात शोषण यावरच विवाहसंस्था टिकलीये आणि यांसाठीच टिकवली गेलीये.. आपल्याकडे प्रेमापेक्षा नातं महत्वाचं मानलंय, म्हणून मग नात्यातलं प्रेम संपून ते कोरडेठाक झालं तरी ते टिकवण्याकडं समाजाचा कल असतो.. खरंतर प्रेम असताना लग्न न करता एकत्र राहिलं तर हरकत नाही, पण प्रेम नसताना लग्न करून एकत्र राहायचं म्हणजे ‘सजा’च असते..

जातपात पैसाप्रतिष्ठा कुंडली सोयरीक असलं काहीबाही बघून त्या दोघांना एकमेकांना बोलायला मोकळं सोडलं जातं. त्यात ते एकमेकांतलं काय बघतात आणि आपलं काय दाखवतात, हे खूपच subjective आहे.. आणि बरीच जोडपी तर यात चक्क एकमेकांच्या प्रेमात पडल्याचं देखील स्वतःला वाटून घेतात!! (ते actually, Fatuous Love असतं, रोमँटिक नसतं!) असो..

भारतात भलेही प्रेमावर हजारो चित्रपट तयार होतात, शेकडो कथा-कादंबऱ्या कविता लिहिल्या जातात, तरी प्रत्यक्ष आयुष्यात मात्र प्रेम करायचं की नाही, हे आई-वडील, नातेवाईक आणि इथला समाज ठरवत असतात. पण प्रेमासारख्या अंतःप्रेरणीय अनुभूतीला काळाच्या कसोट्या लागू होऊ शकत नाहीत, रूढी परंपरांच्या चौकटी बांध घालू शकत नाहीत आणि समाजाची बंधनं बांधूनही ठेऊ शकत नाहीत..

जेंव्हा दोन जीव एकमेकांकडे आकृष्ट होतात, एकमेकांच्या मनात घर करतात, एकमेकांच्या सुख-दुःखांशी समरस होतात आणि एकमेकांच्या वेगळेपणाबद्दल आदर बाळगण्याची जबाबदारी स्वीकारतात, तिथंच ते प्रेम सफल होतं.. लग्न होवो न होवो, त्यांच्या मनातून ते कोणीच कधीच काढू शकत नाही.. उलट, असे (लग्न करून अजून कॉम्प्लिकेट न झालेले ‘बिना सात फेरों’वाले) रिश्तेच जास्त सच्चे असतात, अन एकमेकांच्या मनात दीर्घकाळ टिकतात..

हमने देखी है, इन ऑंखोंकी महकती खुशबू..
हाथ से छू के इसे, रिश्तों का इल्ज़ाम न दो..
सिर्फ एहसास है ये, रूह से महसूस करो..
प्यार को प्यार ही रहने दो, कोई नाम न दो..

डॉ सचिन लांडगे (भूलतज्ञ, अहमदनगर) याच्या फेसबुक वॉलवरुन साभार.

 

Leave a Comment