संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाची आठवण म्हणून साजरा केला जातो १ मे हा महाराष्ट्र दिन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | मराठा तितुका मिळवा मिळवावा|महाराष्ट्र धर्म वाढवावा| या समर्थ रामदासांच्या ओळी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाने देखील सार्थ करून दाखवल्या आहेत. मराठी माणसाच्या हक्काची मुंबई महाराष्ट्राला मिळाली खरी मात्र य साठी १०५ लोकांना आपल्या प्राणाची आहुती या कार्यात द्यावी लागली.

मराठी भाषिकांचे राज्य व्हावे हि मागणी सर्व प्रथम  ग.त्र्यं. माडखोलकरांनी १९४० मध्ये केली. या आधी १९२० साली नागपूर या ठिकाणी पार पडलेल्या कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात महात्मा गांधी यांनी भाषावार प्रांत रचना झाली पाहिजे हा मुद्दा मान्य केला होता. तसेच लोकमान्य टिळकदेखील या मुद्द्याच्या बाजूचे होते. मात्र पंडित नेहरुंनाहा मुद्दा राष्ट्रीय एकतेस बाधक वाटत होता. म्हणून त्यांनी अनेकदा या मुद्द्याचा विरोध देखील केला होता. १९४६ साली भरलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अधिवेशनात कॉंग्रेस नेते स.का.पाटील यांनी मुंबई महाराष्ट्राची राजधानी करण्यास विरोध केला. तेव्हा पासून ते संयुक्त महाराष्ट्र होई पर्यत स.का.पाटील आणि मोरारजी देसाई मुंबई महाराष्ट्राची मानण्यास तयारच नव्हते.

संयुक्त महाराष्ट्राच्या तीव्र आंदोलनापुढे नमते घेवून पंडित नेहरू यांनी मुंबई सहित महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे स्वतंत्र राज्य देवून टाकले मात्र बेळगाव ,कारवर, डांग उंबरगाव , बिदर हा मराठी भाषिक भाग महाराष्ट्र राज्य रचना आयोगाच्या चुकीमुळे कायमचा महाराष्ट्रापासून दूर गेला. ज्या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली तो दिवस होता १ मे १९६०. म्हणून हा दिवस महाराष्ट्रात ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी संयुक्त महाराष्ट्रासाठी शहीद झालेल्या १०५ हुतात्म्यांचे स्मरण केले जाते. त्याच प्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात भारताच्या राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहन करून हा दिवस साजरा केला जातो.

Leave a Comment