व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

जळगाव जिल्ह्यात अवैध गौण खनिज कारवाईतून सात महिन्यांत सहा कोटींची कमाई,  ८२ गुन्हे दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जळगाव जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई करत महसूल प्रशासनाने सात महिन्यांत तब्बल सहा कोटी ७९ लाख १३ हजार १७४ रुपयांचा दंड वसूल केला आहे. या प्रकरणांमध्ये ८२ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ५१२ वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. यात ११३ संशयितांना अटक करण्यात आली आहे. असे असतानाही अजूनही वाळू तस्कर अनेक क्लुप्त्या वापरत अवैध गौण खनिजाची चोरटी वाहतूक सर्रासपणे करत असल्याचे दिसते. यामुळे शासनाचा महसूल बुडत असल्याने कारवाईत सातत्य ठेवले जाईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

 

जिल्ह्यात वाळू माफियांकडून एकाच पावतीवर अनेक वाहने भरून वाळूचे खुलेआम उत्खनन करुन वाहतूक केल्याचे निदर्शनास आले आहे. धुळे, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, जालना, नाशिक येथील पावत्यांवर जळगाव जिल्ह्यातून गौण खनिजाची मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याचे निदर्शनास आले होते. राज्यभरातील गौण खनिजाबाबत सर्वत्र अशी स्थिती असल्याने शासनातर्फे धोरण ठरविण्यात येऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात प्रशासनाकडून गौण खनिज विकण्याचे ठरविण्यात आले. परंतु नियमांना बगल देत अवैधपणे गौण खनिजाची वाहतूक सुरु असल्याचे दिसते.

 

जळगाव जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन, उपसा व वाहतुकीवर नियंत्रणासाठी पोलीस आणि महसूल प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. यात एक एप्रिल ते १० ऑक्टोबर या सात महिन्यांत अवैध गौण खनिजाची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर, डंपरवर जप्तीची कारवाई करण्यात आली. तब्बल ५१२ वाहनांना सहा कोटी ७९ हजार १७४ रुपयांचा दंड सुनावण्यात आला, तर दंडापोटी तीन कोटी दोन लाख ६९ हजार २४० रुपये वसूल करण्यात आले आहेत.

 

सात महिन्यांत अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीत जळगाव, चाळीसगाव हे तालुके आघाडीवर आहेत. या तालुक्यांत प्रत्येकी ८० वाहनांवर, तर त्याखालोखाल अमळनेर तालुक्यात ५७, भडगावात ४९, एरंडोलमध्ये ४३ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. पाचोरा ३६, यावल ३२, धरणगाव ३१, रावेर २८, भुसावळ २५, चोपडा १७, मुक्ताईनगर १२, पारोळा व जामनेर या तालुक्यांत प्रत्येकी १० आणि बोदवड तालुक्यात दोन अशा जिल्ह्यात ५१२ वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. एक एप्रिल ते १० ऑक्टोबर या कालावधीत सहा कोटी, ७९ लाख, १३ हजार, १७४ रुपयांचा दंड आकारण्यात आला, तर दंडापोटी तीन कोटी, दोन लाख, ६९ हजार २४० रुपये वसूल करण्यात आले असून, दंड व बंधपत्र घेतल्यानंतर २२९ वाहने सोडण्यात आली आहेत.

 

जिल्ह्यात गौण खनिज उत्खनन, वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, सात महिन्यांत ८२ गुन्ह्यांत १३३ संशयितांना अटक करण्यात आली आहेत. जळगाव तालुक्यात सर्वाधिक २७ गुन्ह्यांत ५३ संशयितांना अटक केली आहे. त्याखालोखाल भडगाव तालुक्यात १४ गुन्ह्यांत १४, भुसावळमध्ये आठ गुन्ह्यांत १४, चाळीसगावात आठ गुन्ह्यांत ११, धरणगावात सहा गुन्ह्यांत सात संशयितांना अटक करण्यात आली आहे.