व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

जळगावात सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांच्यासह पाच जणांविरुद्ध खंडणीप्रकरणी गुन्हा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील दिग्गज नेत्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याच्या कथित प्रकरणात गोत्यात आलेले माजी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यासह पाच जणांविरुद्ध चार कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी जळगावातील जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

यासंदर्भात तेजस मोरे (रा. जिल्हा परिषद कॉलनी, जळगाव) यांनी तक्रार दिली असून महाविकास आघाडी सत्तेत असताना भाजपा नेते गिरीश महाजन यांच्याविरुद्ध निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाला मराठा विद्याप्रसारक मंडळातील अंतर्गत वाद कारणीभूत असल्याचा, तर खडसेंच्या सांगण्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप महाजनांकडून झाला होता. राज्यात सत्तांतरानंतर आलेले माजी विशेष सरकारी वकील ॲड. चव्हाण यांच्या कार्यालयात केलेले स्टींग ऑपरेशन समोर आले होते. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. आता ॲड. चव्हाण पुन्हा  वादात सापडले आहेत. चार कोटींची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली  ॲड. चव्हाण, त्यांचे पुत्र आणि अन्य तीन, अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते जळगाव येथे १६ नोव्हेंबरच्या रात्री अकरा ते साडेअकराच्या दरम्यान जिल्हा परिषद कॉलनीतील रस्त्यावऋण जात असताना मुखपट्टी लावून आलेल्या चौघांनी अडवले. त्यातील एकाने शिवीगाळ करत चार कोटी आताच दे, नाहीतर तुला जीवे ठार मारतो, अशी धमकी दिली होती. त्यातील एकाने कानाखाली मारल्याने, मोरे यांनी आरडाओरड केला. त्यामुळे चौघेही महामार्गाच्या दिशेने पसार झाले. या तक्रारीवरुन ॲड. चव्हाण आणि त्यांचा मुलगा चिन्मय चव्हाण यांच्यासह विलास आळंदे, निखिल आळंदे, स्वप्नील आळंदे (सर्व रा. पुणे) या पाच जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.