Tuesday, January 31, 2023

सासू – सुनेचा वाद टोकाला; सासूची गळा चिरून हत्या

- Advertisement -

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – आपण पाहत असतो सासू आणि सुनेमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होत असतात. मात्र जळगावमध्ये एक अशी घटना घडली आहे त्यामुळे सगळ्यांना धक्का बसला आहे. या घटनेत सुनेने सासूची हत्या केली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात गजानन महाराज नगर भागात सासू सुनेमध्ये मोठा वाद झाला. हा वाद एवढा वाढला कि सुनेने सासूची विळ्याने गळा चिरून हत्या केली आहे. मृत सासूचे नाव द्वारकाबाई सोनवणे असे आहे. गेल्या 8 वर्षांपासून सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी करणाऱ्या रविंद्र सोनवणे आणि त्यांचा परिवार भुसावळ शहरातील गजानन महाराज नगरमधील पद्माबाई विद्यालय येथे राहत आहे. बुधवारी रवींद्र सोनवणे हा काही कामानिमित्त बाहेर गेलेला असताना सासू द्वारकाबाई आणि सुन उज्वला यांच्यात जोरदार वाद झाला.

- Advertisement -

यानंतर हा वाद एवढा वाढला कि उज्वला रविंद्र सोनवणे हिने सासू द्वारकाबाई पंढरीनाथ सोनवणे यांची धारदार विळ्याने गळा चिरून हत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे आणि प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.