जसप्रीत बुमराह वर्ल्डकप मधून बाहेर; भारतीय संघाला मोठा झटका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 16 ऑक्टोबर पासून ऑस्ट्रेलिया मध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. भारताचा भरवशाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह वर्ल्डकपला मुकणार आहे. पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याला बरे होण्यासाठी 4 ते 6 महिने लागतील. बुमराहच्या रूपाने भारतीय संघाला मिशन वर्ल्डकप पूर्वीच मोठा झटका बसला आहे.

मागील महिन्यात पार पडलेल्या आशिया कप मधेही बुमराह खेळू शकला नव्हता. यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत पुनरागमन केले. मात्र येथेही तो पहिला सामना खेळू शकला नाही. मात्र त्यानंतरचे दोन्ही सामने तो खेळला होता. बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 मध्येही तो संघाचा भाग नव्हता. सरावाच्या वेळी त्याने पाठदुखीची तक्रार केली होती. त्यानंतर वैद्यकीय संघाच्या सांगण्यावरून त्याला पहिल्या T20 सामन्यातून वगळण्यात आले होते.

टी-20 विश्वचषकासाठी संघाची घोषणा झाल्यापासून टीम इंडियाचे टेन्शन वाढत आहे. यापूर्वी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा दुखापतीमुळे विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यानंतर दीपक हुडालाही दुखापतीचा सामना करावा लागला असून तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेतून बाहेर पडला होता. त्यातच आता दिग्गज खेळाडू जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीमुळे विश्वचषकात भारताच्या अडचणीत वाढ होणार आहे.

गेल्या काही दिवसापासून विशेषतः डेथ ओव्हर मध्ये भारताची गोलंदाजी अतिशय सुमार होत आहे. १८, १९, आणि २० वे षटक अतिशय महागडी ठरत आहेत. अशावेळी जसप्रीत बुमराह सारखा T २० स्पेशालिस्ट गोलंदाज संघात नसल्याने भारतीय संघाला विश्वचषक स्पर्धेपूर्वीच मोठा झटका बसला आहे.