जयकुमार गोरेंसह पत्नी सोनिया गोरे यांना अटकपूर्व जामीन मंजूर

बनावट कागदपत्र फसवणूक प्रकरण : वडूज पोलीस ठाण्यात दाखल होता गुन्हा

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

मायणी येथील मागासवर्गीय मयत व्यक्तीची बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्याच्या प्रकरणी भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांच्यासह त्यांच्या पत्नी व अन्य लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान आज वडूच येथील न्यायालयात बनावट कागदपत्र फसवणूक प्रकरण व गोरे दांपत्यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जाच्या प्रकरणावर सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने आ. जयकुमार गोरे, सोनिया गोरे, शैलजा साळुंखे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.

याबाबत अधिक माहिती अशी की, खटाव तालुक्यातील मायणी येथील पिराजी विष्णू भिसे यांचा मृत्यू झाला असतानाही ते जिवंत असल्याचे भासवून जमिनीचे बोगस दस्तऐवज तयार करण्यात आले होते. यामध्ये भिसे कुटुंबीयांची फसवणूक केल्याप्रकरणी आ. जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडिबा घुटुगडे (विरळी, ता. माण), महेश पोपट बोराटे (बिदाल, ता. माण) व अन्य दोघांविरोधात दहिवडी पोलीस ठाण्यात महादेव पिराजी भिसे यांनी फिर्याद नोंदवली होती. त्यानंतर त्यांच्यावर ऍट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी संबंधित आरोपीना अटकही करण्यात आली होती.

दरम्यान, बोगस दस्तऐवज फसवणूक प्रकरणी भिसे यांच्या नावाने सह्या करणाऱ्या संजय काटकरला पोलिसांनी याआधीच अटक केली. तसेच न्यायालयाने त्याला 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान, आज जयकुमार गोरे, पत्नी सोनिया गोरे, शैलजा साळुंखे यांच्याबाबत सुनावणी पार पडली. यावेळी वडूज येथील न्यायालयाने गोरेंसह त्याच्या पत्नी सोनिया गोरे व शैलजा साळुंखे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.