Friday, January 27, 2023

जायकवाडी धरण 75 टक्क्यांवर !

- Advertisement -

औरंगाबाद – औरंगाबाद शहराची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या धुवाधार पावसाने नाथसागरात 17 हजार 937 क्‍युसेक अशी आवक सुरू आहे. बुधवारी दुपारनंतर नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून गोदावरीत विसर्ग करण्यात आल्याने जायकवाडी धरणात येणारी आवक मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचे धरण नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले आहे. दरम्यान बुधवारी रात्री धरणाचा जलसाठा 75 टक्के झाला होता. धरणात येणारा येवा लक्षात घेता धरण पूर्ण क्षमतेने भरेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या औरंगाबाद व नगर जिल्ह्यातील शेवगाव, नेवासा या तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने मंगळवार दुपारनंतर जायकवाडी धरणात येणारी आवक वाढत गेली. दरम्यान, बुधवारी सकाळी 17 हजार 937 क्‍युसेक अशा मोठ्या क्षमतेने नाथसागरात पाणी दाखल होत होते. यानंतर बुधवारी नाशिक जिल्ह्याला जोरदार पावसाने झोडपून काढल्याने तेथील धरण समूह पैकी दारणा 2 हजार 708 क्‍युसेक, गंगापूर 1 हजार 129 क्‍युसेक, गौतमी 750 व कडवा धरणातून 424 क्‍युसेक असा विसर्ग दुपारी करण्यात आला.

- Advertisement -

अशातच काल सायंकाळी नांदूर-मधमेश्वर धरणातून मात्र 14234 असा मोठा विसर्ग गोदावरी पात्रात करण्यात आला. यात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे नाशिक पाटबंधारे विभागाने कळविले आहे. यामुळे जायकवाडी धरणात मोठी आवक होऊन जलसाठ्यात वाढ होणार असल्याचे धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले. काल धरणात एकूण जलसाठा 2 हजार 357.494 दलघमी इतका झाला आहे. येणारी आवक लक्षात घेता धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.